पाली – बंधारा उठला शेतकर्‍यांच्या मुळावर

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील सिद्धेश्‍वर ग्रामपंचायत हद्दीतील खांडसई कासारवाडी येथे बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र हा बंधारा शेतकर्‍यांना तारणारा नव्हे तर मारक ठरला आहे. या बंधार्‍यामुळे शेतकर्‍यांची पिकती भातशेती नापीक झालीय. पिकती भातशेती नापीक झाल्याने शेतकरी आक्रमक झालेत. सोन्यासारखं धान्य देणार्‍या शेतीत आता दगड गोटे व उंच उंच गवत वाढलेले दिसत आहे. एरव्ही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन देणार्‍या शेतीत पाणी घुसत आहे, परिणामी शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय बंधार्‍यामुळे शेताकडे जाणारे मार्ग देखील बंद झाल्याने शेती असून नसल्यासारखीच अशी व्यथा शेतकर्‍यांनी मांडली. शेतकरी व ग्रामस्थांनी पाली सुधागड पंचायत समिती सभापती व गटविकास अधिकारी पाली सुधागड यांना निवेदनाद्वारे आपली कैफियत मांडली व न्यायाची अपेक्षा केलीय. जलशिवार योजनेअंतर्गत लाखो रुपयांचे काम मंजूर झाले. या योजनेचे टेंडर आर सी पाटील याने भरून कामाला सुरुवात केली. यामध्ये दोन हौदाचे काम पूर्ण केले. तसेच तलाव पंप हाऊस व पाटबंधारा सिद्धेश्‍वर सरपंच यांच्या स्वाधीन केले. यावेळी बांधण्यात आलेला बंधारा इंजिनीअर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधला गेला नसल्याचा आरोप ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ खांडसई यांनी तक्रारी निवेदनात केलाय. बंधारा निर्माण होतेवेळी गावकर्‍यांना मुबलक पाणी मिळण्याची मोठी आशा होती, बंधारा असताना देखील ऐन उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात येथील महिलांची, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती होताना दिसते.

जलयुक्त शिवार योजनेचे काम अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत असल्याची वस्तुस्थिती खांडसई व कासारवाडी ग्रामस्थांनी मांडली. येथील बंधारा बाधित शेतकरी असलेले राजाराम चव्हाण म्हणाले की, बंधार्‍यामुळे शेतात पाणी शिरत असल्याने तीन चार वर्षात पीक घेता आले नाही, बंधार्‍यामुळे शेतात जाण्याची वाट अडली आहे. गुरा ढोराना चरण्यासाठी देखील जाता येत नाही, आम्हाला इतक्या वर्षांची नुकसानी मिळाली पाहिजे. येथील दिव्यांग ग्रामस्थ चंद्रकांत चव्हाण यांनी देखील बंधार्‍यामुळे होणार्‍या नुकसानीचा पाढा वाचला, त्यांनी सांगितले की येथील बंधार्‍याचे काम योग्य पद्धतीने झाले नाही, त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना बंधार्‍याचा लाभ कमी मात्र नुकसानच अधिक सोसावी लागतेय. चार वर्षात येथील विकासकामे अपूर्ण आहेत, याला सिद्धेश्‍वर ग्रामपंचायत जबाबदार आहे. असा आरोप चव्हाण यांनी केला. या संदर्भात आम्ही गटविकास अधिकारी विजय यादव यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यास संपर्क साधला असता सदर ग्रामस्थांच्या तक्रारीचा संदर्भ पाहून पुढील कार्यवाही करू असे सांगितले.

Exit mobile version