पाली ग्रामपंचायत बिनविरोध अधिकृत घोषणा बाकी

। कर्जत । प्रतिनिधी ।
जून ते सप्टेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 13 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या, मात्र या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दि.26 सप्टेंबर रोजी रात्री निवडणूक आयोगाकडून उशिरा आलेल्या फॅक्समध्ये या निवडणुका 16 ऑक्टोबर रोजी घेण्यात याव्यात, अशा सूचना करण्यात आल्या असून, निवडणूक मतमोजणी 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. कर्जत तालुक्यातील पोटल आणि पाली या दोन ग्रामपंचायतीसाठी दि.16 ऑक्टोबर रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे, त्यासाठी बुधवार दि.21 सप्टेंबर ते मंगळवार दि.27 सप्टेंबर पर्यत नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची मुदत होती.

दि.27 सप्टेंबर शेवटच्या दिवशी पोटल ग्रामपंचायतीमधील 9 सदस्यांसाठी 31 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत, तर सरपंचपदासाठी 5 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. पाली ग्रामपंचायतीमधील 7 सदस्यांसाठी 7 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत, तर सरपंचपदासाठी 1 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे, त्यामुळे पाली ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. मात्र, 30 सप्टेंबरनंतर याची अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित खैरे यांनी दिली.

Exit mobile version