। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
पाली शहरात नववर्षाच्या पहिल्या व दुसर्या दिवशी शनिवारी व रविवारी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. तसेच सुधागड तालुक्यातील पर्यटनस्थळे, लेण्या, स्तूप व अन्य पर्यटनस्थळी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसराला जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते. दर्शनासाठी रायगड जिल्हा, महाराष्ट्रातील विविध भागांसह मुबंई, ठाणे पुणे आदी शहरांतील आणि परराज्यातून भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. पाली नगरपंचायतीचे कर्मचारी मास्क न लावणार्या भाविकांकडून दंड वसूल करत होते. तसेच मास्क घालण्याच्या सूचना देत होते.
व्यवसाय तेजीत
भाविकांची गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यवसायिकांचा धंदा तेजीत होता. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा चांगला झाला. उन्हेरे येथील कुंडांना पर्यटक व नागरिकांची सर्वाधिक अधिक पसंत आहे. कारण या कुंडातील पाणी आंघोळीसाठी योग्य आणि स्वच्छ आहे.
वाहतूक कोंडी
पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमूळे वाहतुक कोंडी झाली होती. परंतू पाली पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने पाली पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व वाहने भक्तनिवास क्रमांक 1 च्या बाजूने वळविण्यात आली होती.
- नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आले होते. अनेकांनी चांगली खरेदी देखील केली. त्यामुळे व्यवसाय देखील चांगला झाला. – राहुल मराठे, व्यवसाईक, बल्लाळेश्वर मंदिर
- देवस्थान ट्रस्टने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोनाकाळात विशेष खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. देवस्थानचे दोन भक्त निवास नाममात्र दरात भाविकांसाठी उपलब्ध केले आहेत दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. – अॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली