माघी गणेशोत्सवासाठी पाली सज्ज

मंदिराला आकर्षक रोषणाई

| पाली | वार्ताहर |

माघी गणेशोत्सवासाठी शहर सज्ज झाले असून, गणेश जन्मोत्सवानिमित्त अष्टविनायकांपैकी एक असलेले श्री बल्लाळेश्वराचे मंदिर आकर्षक रोषणाईने न्हाऊन निघाले आहे. बाप्पांच्या दर्शनासाठी सोमवारपासूनच गणेशभक्त येथे दाखल झाले आहेत.

गणेश भक्तांची परम श्रद्धा असलेल्या श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाला दररोज शेकडो भाविक दूरदूरहून येत असतात. विनायकी, संकष्ट, अंगारक चतुर्थीला दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत असते. माघी गणेश जयंतीला महाराष्ट्रासह देशभरातून प्रचंड संख्येने भाविक येतात. उत्सवानिमित्त मोठी यात्रा भरत असल्याने मोठी आर्थिक उलाढाल दोन ते तीन दिवसांच्या कालावधीत होते. यावर्षी मंदिरासह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईसह मंदिरात मनमोहक फुलांचीही सजावट करण्यात आली आहे. दर्शनासाठी आदल्या दिवशी रात्रीपासूनच रांगा लागत असल्याने भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून देवस्थान समितीने सर्वतोपरी काळजी घेतली आहे.

Exit mobile version