सलग सुट्यांमध्ये पर्यटकांची गर्दी
| पाली | वार्ताहर |
शनिवार ते सोमवार अशा सलग तीन सुट्यांमुळे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पालीतील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. येथूनच पुढे दक्षिण रायगड, कोकणात तसेच पुणे-मुंबईकडे पर्यटक रवाना होत असल्याने पाली शहरात शनिवार, रविवारी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस तसेच देवस्थानच्या सुरक्षारक्षकांकडून कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी अरुंद रस्ते, अतिक्रमणामुळे त्यांची पुरती दमछाक झाली. पाली नगरपंचायती शहरात काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे, मात्र तरीही कोंडी सुटलेली नाही. शिवाय रस्ते खराब असल्याने धुरळ्याचा प्रवाशांना प्रचंड त्रास होत असल्याचे येथील वकील स्वराज मोरे यांनी सांगितले.
सलग सुट्यांमुळे शनिवार, रविवारी मोठ्या प्रमाणात गाड्या व बस पाली शहरात दाखल झाल्या होत्या. अरुंद रस्ते, नो एन्ट्रीतून जाणारी वाहने, अवजड वाहनांची रेलचेल, वाहतुकीच्या नियमांच्या पायमल्लीमुळे कोंडीत भर पडत आहे. अरुंद रस्त्यांमुळे वाहने समोरासमोर आल्यास मंदिर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून भाविकांची गैरसोय होते.
प्रणाली सूरज शेळके
पालीतील काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले आहे. रस्ते रुंद केले आहेत. पाली शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. प्रशासनाकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, मात्र चालकांनीही वाहतुकीचे नियम पाळावेत.
नगराध्यक्ष, नगरपंचायत पाली