देवस्थान ट्रस्टकडून जय्यत तयारी; भाविकांसाठी चोख व्यवस्था
| पाली | प्रतिनिधी |
पालीच्या श्री बल्लाळेश्वराचा माघी गणेशोत्सव यावर्षी शनिवार दि.19 ते 23 जानेवारी 2026 दरम्यान होत आहे. त्यानिमित्ताने लाखो भाविक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आपल्या गणरायाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी पालीत येतात. त्या नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट सज्ज झाली आहे. याबाबत सुधागड तालुक्याचे तहसीलदार उत्तम कुंभार, पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर, पाली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच बल्लाळेश्वर संस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे व पदाधिकारी यांच्या नियोजनाखाली हा सोहळा संपन्न होणार आहे.
यावेळी पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त ठेवणार असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. राज्य परिवहन मंडळाकडून जादा गाड्यांची सोय करण्यात आली असून त्याचे आरक्षण पाली बस स्थानक तसेच मंदिर परिसरात देखील एक विशेष सोय करण्यात आली आहे. महावितरण विभागाकडून विशेष मेहनत घेण्यात येत आहे. उत्सवाच्या कालावधीत वीज जाणार नाही तसेच रस्त्यावर जी दुकाने यात्रेत मांडली जाणार आहेत, त्यांना तात्पुरत्या स्वरुपात वीज कनेक्शन देण्यात येणार असून कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आरोग्य तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कमर्चारी यांचे सहकार्य असून त्यांनी देखील या जत्रेसाठी विशेष नियोजन केले. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेणार येणार आहे. यात्रेकरूंच्या सोयीसाठी तसेच या कालावधीत स्वच्छता राहावी म्हणून नगरपंचायतीकडून जागोजागी कचराकुंड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच फिरते शौचालयाची देखील सोय करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
मोफत नाश्ता, रिक्षांची सोय
मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी विशेष मेहनत घेतली आहे. भाविकांना रांगेत उभे असताना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सावलीची सोय तसेच, भाविकांसाठी मोफत नाश्ता आणि प्रसादाची सोय करण्यात आली आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच जितेंद्र गद्रे यांनी केले आहे. तसेच, या कालावधीत गावातील ट्रफिक रोखण्यासाठी मोठ्या गाड्यांची वाहतूक गावाबाहेर, उंबरवाडी तसेच प्राजक्ता हॉटेल समोर करण्यात आली आहे. तेथून भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानच्या वतीने रिक्षांची मोफत सोय मंदिर पार्किंगपर्यंत करण्यात आली आहे.
