‘दिगंबरा’च्या जयघोषात पालखी सोहळा उत्साहात
| चौल | प्रतिनिधी |
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात चौल-भोवाळे येथील पर्वतनिवासी दत्त मंदिरातून दत्तमहाराजांच्या पादुकांवर अभिषेक घालून पालखी परिक्रमणेला गुरुवारी (दि. 29) सकाळी सात वाजता सुरुवात झाली. यावेळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पालखीवर होणारी फुलांची उधळण, ठिकठिकाणी सुवासिनींकडून करण्यात येत असलेले औक्षण, दर्शनासाठी भाविकांची होत असलेली गर्दी, सोबत टाळ-मृदुंगाचा गजर अन् अव्याहतपणे सुरु असलेल्या भजनाच्या गायनाने चौलनगरी दुमदुमून जाऊन वातावरण भक्तिमय झाले होते.
श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबागचे संस्थापक अध्यक्ष महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमहाराजांच्या पादुकांच्या पायी पालखी परिक्रमेणेचे आयोजन करण्यात आले होते. अशी पालखी परिक्रमा 1913 आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास शंभर वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर 2019पासून भव्य दिव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात येत असून, पालखी परिक्रमेचे हे पाचवे वर्ष आहे, अशी माहिती श्री. मोरे यांनी दिली. या पालखी परिक्रमणेत शेकडोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. पर्वतनिवासी दत्तात्रेयांचे स्वयंभू स्थान असलेल्या संपूर्ण भोवाळे डोंगराला पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली.
दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा अखंड जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर, पादुका आणि मूर्तीवर होणारी पुष्पवृष्टी, मंदिरात केलेली विविधरंगी फुलांच्या माळांची आकर्षक सजावट आणि याची देही याची डोळा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर जमलेली भाविकांची गर्दी अशा भक्तिमय वातावरणात दत्तमहाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही पालखी चौल भोवाळेमार्गे मुख्य रस्त्यावरुन चौलनाका, चौल भाटगल्ली, सागमळा, चौलमळा येथून पुढे देवघर, सराई, हनुमानपाडा अशी मार्गक्रमणा करीत पुन्हा भोवाळे येथून मुख्य प्रवेशद्वारातून दत्तमंदिरात सायंकाळी पाचच्या सुमारास प्रस्थान झाली. या पालखी मिरवणुकीने संपूर्ण चौल परिसर दुमदुमून गेला होता. ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून पिण्याचे पाणी आणि सरबताचे वाटप करण्यात आले. मध्यान्ह भोजनाचीही व्यवस्था चौलमळा येथील दत्तभक्त सुजित नाईक यांच्या निवासस्थानी करण्यात आली होती.
पालखी परिक्रमणेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मंदिरात महाआरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. महाप्रसादाच्या आस्वादाने भाविक कृतार्थ झाल्याचे पाहावयास मिळाले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबाग विश्वस्त मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सागर कुंड, सचिन शिंत्रे, श्री. आवास्कर, नरेश पटेल, संजय लखमदे, भास्कर राऊत, राहुल विद्रे, प्रदीप आंग्रे, गणेश कडव, अविनाश पाटील, राजेश शेळके, महेश पाटील, प्राजक्ता लखमदे, शोभा सिंग, साक्षी शिंत्रे, क्षमा मांजरेकर, जेसीका आवास्कर, जान्हवी पवार, अंकिता विद्रे, अमृता पाटील, सुप्रिया कुंड, सुनीता चव्हाण, विघ्नेश सुर्वे, मिहीर मोरे, आदित्य सुर्वे, वृषभ कडव, दर्पण पाटील, सचिन चव्हाण, रोहन ठाकूर, शिवानी सुर्वे, कीर्ती पवार, नीलम चव्हाण, कोमल गोडे, अपूर्वा मोरे यांच्यासह पंचक्रोशितील दत्तभक्त ग्रामस्थ व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या दत्तभक्तांनी मेहनत घेतली.
महेश मोरे, संस्थापक-अध्यक्ष, श्रीदत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट
पालखी परिक्रमेचे हे सलग पाचवे वर्ष असून, याहीपुढे हा सोहळा दरवर्षी अखंडितपणे सुरु राहणार आहे. दत्तभक्तांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हा सोहळा यशस्वी पार पडला. दत्तमंदिरात दर गुरुवारी अन्नदान करण्यात येते, यापुढेही अन्नदानाचा यज्ञ अखंडितपणे सुरू राहणार आहे. तसेच, हा कार्यक्रम दरवर्षी असाच भव्यदिव्य करण्याचा प्रयत्न राहील.
अन्नदानाचे पुण्य दत्त मंदिरात दर गुरुवारी अन्नदान करण्यात येत असून, यापुढेही ते करण्यात येईल. दरम्यान, अन्नछत्रच्या माध्यमातून पंढरपूर, गाणगापूर, गोंदिवलेकर महाराजांच्या पावनभूमीत अन्नदान करण्यात आले. अन्नछत्र ट्रस्टच्या माध्यमातून अन्नदानाचा घेतलेला वसा असाच कायम सुरू राहणार असून, हे पुण्याचे काम आम्ही करीतच राहणार आहोत, अशी ग्वाही महेश मोरे यांनी दिली.