| तळा | वार्ताहर |
तळा शहराची ग्रामदेवता श्री चंडिका देवी पुनः दर्शन सोहळ्याचे आयोजन दि.5 व 6 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी दैदिप्यमान असा पालखी सोहळा साजरा करण्यात आला.
यावर्षीचा यजमान पदाचा मान असलेल्या श्री नामदेव शिंपी समाज व बाजारपेठेतील नागरिकांनी सकाळी 10 वाजता श्रीकांत वेद0क यांच्या घरापासून श्री चंडिका देवी मंदिरापर्यंत देवीची पालखी मिरवणूक काढली.या पालखी मिरवणुकीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आनंदाने सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाच्या तालावर भाविक भजनात दंग होऊन नाचत होते.भजनात पुरुषांसह महिलांचा सहभाग लक्षणीय होता.एकीकडे खालू बाजाच्या तालावर तरुणांनी ठेका धरला होता तर दुसरीकडे लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.घाल फुगडी राधे घाल फुगडी च्या तालावर महिलांसह पुरुषांनाही फुगडी खेळण्याचा मोह आवरता आला नाही.
यावेळी पालखी मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी फुगडी खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.यावेळी लहान मुलांनी ऐतिहासिक शिवकालीन वेशभूषा साकारली होती.तसेच मर्दानी लाठीकाठी चा थरार देखील नागरिकांना अनुभवायला मिळाला.एकंदरीत चंडिका देवीचा पालखी सोहळा नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.