अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
क्वेस्ट ही संस्था 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांची शाळापूर्व शैक्षणिक तयारी होण्यासाठी पालवी प्रकल्प राबवते. हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात राबवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा परिषद व क्वेस्ट संस्था यांच्यामध्ये करारनामा करण्यात आला आहे. जिल्ह्यात हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी खालापूर प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे.
या प्रकल्पाची खालापूरमध्ये सुरुवात म्हणून पालवी प्रकल्पांतर्गत अमरावती जिल्ह्यातील तिवसा प्रकल्प व यवतमाळ येथील नेर प्रकल्प पाहण्यासाठी अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला. या अभ्यासदौऱ्यात तिवसा व नेर येथील पालवी अंतर्गत अंगणवाड्यांना भेट दिली. याचसोबत तेथील पर्यवेक्षिका व सेविकांशी संवाद साधून पालवी उपक्रम समजून घेतला.
या अभ्यासदौऱ्यात जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितिन मंडलिक, चेतन गायकवाड, आशा खेडेकर, क्वेस्ट संस्थेचे व्यवस्थापक नितीन विशे सहभागी होते. या दौऱ्यात सहभागी सदस्यांना अमरावतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके व यवतमाळचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांनी त्यांचे अनुभव सांगितले.