काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस
। पेण । वार्ताहर ।
वडखळ गणाचे काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य प्रदिप म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वडखळ सरपंच राजेश मोकल यांच्या विरुद्ध वडखळ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, प्रदिप म्हात्रे यांनी दि. 20 डिसेंबर रोजी वडखळ गावात आरोग्य उपकेंद्र नसल्याने हनुमान मंदिराचे आवारात ग्रामस्थांकरीता कोविड-19 लसीकरणाचा कॅम्प आयोजित केला होता. त्या लसीकरण कार्यक्रमास सुरूवात केल्यावर सकाळी 10ः30 वाजताचे सुमारास वडखळ गा्रमपंचायतीचे विद्यमान सरपंच राजेश भिकाजी मोकल हे तेथे आले. मी वडखळचा मालक आहे तुम्ही विचारल्या शिवाय इथे कॅम्प कसा काय लावला असे बोलुन सदर ठिकाणी गोंधळ घालुन तेथे आलेल्या आरोग्य सेवकांना व ग्रामस्थांना तेथुन पिटाळून लावले. सदरचा लसीकरणाचा कार्यक्रम ग्रामस्थ लसीकरणापासून वंचीत राहु नये म्हणुन आयोजीत केला होता. परंतु वडखळ सरपंच राजेश मोकल यांनी सदरचा कार्यक्रम दमदाटी करून बंद पाडला. अशा प्रकारची तक्रार वडखळ पोलीस ठाण्यात केली असून याबाबत प्रदिप म्हात्रे यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.
सदरील प्रकारा संदर्भात वडखळचे सरपंच राजेश मोकल यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता राजेश मोकल यांच्या फोनची रिंग वाजत होती, परंतु समोरुन फोन उचलला गेला नाही.
पंचायत समिती सदस्यांनी केली सरपंचाविरुद्ध तक्रार
