टी-20 वर्ल्डकपमधून होणार पांड्याचा पत्ता कट ?

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
यूएई आणि ओमानमध्ये होणार्‍या आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने हिंदुस्थानचा संघ जाहीर केला. या संघातील एका नावावर दिग्गज खेळाडूंपासून क्रीडाप्रेमींनीही आक्षेप घेतला आहे. हा खेळाडू म्हणजे हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या याच्या फिटनेसवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असून आता तर वर्ल्डकपच्या संघातून त्याचा पत्ता कट होणार असल्याचेही वृत्त आहे.हार्दिक पांड्या याच्या पाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून त्याने हिंदुस्थानसाठी खेळलेल्या प्रत्येक लढतीमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही बाजू सांभाळलेल्या नाहीत. अनेक लढतींमध्ये पाठीच्या समस्येमुळे तो गोलंदाजीही करू शकला नव्हता. तसेच सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या उर्वरित सत्राच्या पहिल्या दोन लढतीतही तो मुंबई इंडियन्सच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये नव्हता. फिटनेस चांगला नसल्याने त्याची निवड करण्यात आली नव्हती. तसेच मंगळवारी पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या लढतीत पांड्याने मॅचविनिंग खेळी केली असली तरी त्याने गोलंदाजी केली नव्हती. त्यामुळे फक्त फलंदाज म्हणून तो टीम इंडियाकडून दीर्घकाळ खेळण्याची शक्यता कमी आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

पांड्याची भूमिका
टीम इंडियामध्ये पांड्याची भूमिका एका अष्टपैलू खेळाडूची आहे. टी-20 मध्ये महत्त्वाची चार षटके टाकणे आणि फलंदाजीमध्ये अखेरीस येऊन फिनिशरची भूमिका निभावणे हे काम पांड्याचे आहे. गेल्या काही काळात त्याने आपली ही भूमिकाही चोखपणे बजावली आहे. मात्र दुखापत झाल्यापासून तो फक्त फलंदाज म्हणून खेळत आहे. त्यामुळे पांड्या गोलंदाजी करू शकणार नसल्यास त्याच्या जागी फॉर्मात असणार्‍या शार्दुल ठाकूर याची संघात निवड होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे पांड्या गोलंदाजी करु शकणार नसेल तर त्याच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

Exit mobile version