। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील आणि शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेकापक्षाचे नेते माजी आमदार पंडितशेठ पाटील यांच्या हस्ते कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील गरीब आणि गरजू 117 मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिप सदस्या चित्रा पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, माजी सभापती विद्या म्हात्रे, माजी उपसभापती प्रकाश पाटील, विलास म्हात्रे, नरेश म्हात्रे, सुनिल पिंगळे, धुमाळ गुरुजी, अमृत गुरुजी, प्रकाश खरसंबळे, मीनाक्षी खरसंबळे, वाघाडे सरपंच कृष्णा जाधव, अनिल म्हात्रे, यशवंत गुरुजी, शशी गुरुजी, अर्पणा कोठेकर, प्रतिक्षा पाटील, माजी सरपंच अशोक म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेकापक्षाचे नेते माजी आमदार पंडितशेठ पाटील पुढे म्हणाले की, शेकापक्ष सर्व क्षेत्रात काम करीत आहे. जय पराजय होत असला तरी विचार कधी संपत नाही. ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीत शेकापक्षाने मिळवलेला विजय या विकासकामांची पोचपावती आहे. कुसूंबळयात शेकापक्षामुळे विकास शक्य झाला आहे. ज्या पक्षाने चारित्र्यावर संशय निर्माण केला त्याच पक्षात जाऊन शेकापक्षाने काय केले असा सवाल करण्यांची किव येते. जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम शेकापक्षच करु शकतो. आधारकार्ड मतदान कार्डाला जोडण्याची मागणी आपली आहे. त्यामुळे बोगस मतदानाला आळा बसेल. शेकापक्ष कधीच बोगस मतदान करीत नाही. चित्रलेखा पाटील यांचा कौतुकास्पद उपक्रम आहे.
यावेळी चित्रलेखा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलींच्या शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करुन शिक्षणाचे परिणामकारक बदल राबविण्यासाठी शेकापक्षाच्या माध्यमातून पाच लाख सायकलींचे वाटप करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. साडे नऊ कोटी रुपये आरोग्यासाठी खर्च केले. पक्ष म्हणून लोकांना श्वास दिल्याचे समाधान वाटते. मातीशी नाते आहे मताशी नाही. त्यामुळे हे आमचे उपकार नव्हे तर कर्तव्य असल्याचे प्रतिपादन चित्रलेखा पाटील यांनी केले. बदलत्या मानसिकतेत पुढे खूप संधी आहे. मुली आणि मुलांमध्ये फरक मानता कामा नये. काम करणे हे कर्त्यव्य या भावनेतून काम करीत राहिले पाहिजे.
जिप सदस्या चित्रा पाटील म्हणाल्या की, शंभर सायकली एका दिवशी मिळणे ही साधी गोष्ट नाही. पक्षाच्या मार्फत अनेक कामे कुर्डूस मतदार संघात करण्यात आली आहेत. भविष्यात देखील अशीच कामे होत राहतील. कामांच्या पुर्ततेसाठी दिलेला शब्द पुर्ण करण्याकडे शेकापक्षाचा नेहमीच कल असतो. शेकापक्षाने दिलेली बांधीलकी आणि संस्कार यामुळे आपण नेहमीच जनतेच्या कामासाठी तत्पर असतो. मात्र जेवढे काम आपण करतो त्याची तेवढी प्रसिद्धी आपण करत नाही. आपण शंभर रुपयाचे काम केले तरी एक रुपयाचीही प्रसिद्धी करीत नाही. पण आता दिवस असे आले की मात्र एक रुपयांचेही काम न करणारे शंभर रुपयाची प्रसिद्धी करीत असल्याचा टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांना लगावला. आपण जे केलेले आहे तेच बोलावे, जे करायचे आहे त्यासाठी परिक्रमा पुर्ण करावी. त्यानुसार दिलेल्या शब्दानुसार सायकलीचे वाटप करण्याचा चित्रलेखा पाटील यांचे वचन पुर्ण केले आहे. मुली शिकल्या पाहिजेत, पुढे गेल्या पहिजेत. दोन प्रकारचा विकास केला जातो. एक म्हणजे जनतेचा पैसा शासकीय योजनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवून त्यांची कामे करुन विकास केला जातो. दुसरी पद्धत म्हणजे म्हणजे स्वतःचा पैसा, स्वतःचे योगदानातून खिशातून स्वतः आलेल्या निधीतून समाजकार्य करणे. शेकापक्षाची विचारधारेनुसार फक्त शासनाच्या पैशातून आपण विकास कामे करीत नाही तर स्वतःचा पैशा जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम चित्रलेखा पाटील करीत असल्याचे मत व्यक्त करुन त्यांनी कौतुक केले.