अलिबागच्या पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार- पंडित पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

जिल्ह्याचे मुख्यालय असणार्‍या अलिबाग नगरपरिषदेकडे जिल्हा प्रशासन आणि राज्यकर्ते सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने निधी उपलब्ध होत नसल्याने पुरेसा पाणी पुरवठा अलिबागकरांना होत नाही. जिल्हा मुख्यालयात सातत्याने जिल्हाभरातून येणारी जनता तसेच पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांची होणारी गर्दी यामुळे अलिबाग नगरपरिषदेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. अलिबागचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी सांगितले. अलिबाग नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी अंगाई साळूंखे यांची त्यांनी मंगळवारी त्यांच्या दालनात भेट घेत विविध विकासकामांवर चर्चा केली त्यावेळी त्यांनी हे सांगितले.

अलिबाग नगरपरिषद विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असल्याने सत्ताधारी अलिबागकडे दुर्लक्ष करीत आहेत. जिल्हा प्रशासन देखील श्रीवर्धन, खालापूर, पेण, कर्जतला मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देते. मात्र ज्या नगरपालिकेवर शहरातील नागरिकांच्यासोबतच जिल्हा मुख्यालयात सातत्याने येजा करणार्‍या नागरिकांचा तसेच प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने मोठया संख्येने येणार्‍या पर्यटकांच्या सुविधा, पाणी पुवरठा करताना नगरपालिकेची चांगलीच दमछाक होते. जिल्हा प्रशासनाचा कारभार चालविणार्‍या जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रमुख अधिकारी शहरातच रहात असताना त्यांच्या अलिबागच्या असुविधाकडे लक्ष जाऊ नये याबाबत पंडित पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

शहराचा विस्तार होत असताना पाच पाच मजल्यांना परवानगी दिली जात आहे. मात्र त्याबरोबरच नागरी सुविधा पुर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध केला जात नाही. त्यामुळे पाणी पुरवठा, डे्रनेज सिस्टीम तसेच डंपींग ग्राउंड सारख्या सुविधा उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुरेसा निधी उपलब्ध करण्याची गरज आहे. मात्र त्याकडे जबाबदार पुर्वक लक्ष दिले जात नाही. ग्रामीण भागात जलजीवन मिशन सारख्या योजनांतून पुरेसा पाणी होत टँकरमुक्त गावे होत असताना अलिबाग सारख्या शहरात पाणी टंचाई पहायला मिळते हा विरोधाभास जिल्हा प्रसासनाच्या लक्षात येत नाही का, असा सवाल त्यांनी यावेळी व्यक्त केला. लोकांना पाणी मिळायलाच पाहिजे मात्र राज्य सरकार जाणीवपूर्वक पाणीपुरवठा करीत नसल्याचा आरोप देखील पंडीत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. या सार्‍या प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांचे लक्ष वेधणार असल्याचे यावेळी पंडित पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी नगरसेवक अनिल चोपडा तसेच नगरपरिषद अभियंता उपस्थित होते.

Exit mobile version