| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
हार्दिक व कृणाल पंड्या यांच्यासोबत खेळणाऱ्या बडोदा संघाचा माजी मध्यमगती गोलंदाज ऋषी आरोठे याला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली आहे. आरोठेसह आणखी दोघांना 32 लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक झालेली आहे. आरोठेला दुसऱ्यांदा अशा गुन्ह्याखाली अटक झाली आहे. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या संदर्भातील हा घोटाळा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोठेसह सायबर क्राईम पोलिसांनी वोडोदराच्या इनामदार विनायक राजेंदर आणि अका निखिल यांना अटक केली आहे. त्यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने सोशल मीडियावर नामांकित शेअर दलाली कंपन्यांच्या नावाने खोट्या जाहिराती दिल्या होत्या. या जाहिरातींवर क्लिक करणाऱ्या लोकांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून बनावट ट्रेडिंग ॲप डाउनलोड करण्याचे निर्देश दिले गेले. त्या ॲपच्या डॅशबोर्डवर प्रचंड नफा दाखवला जात होता. मात्र, प्रत्यक्षात ऋषी आणि निखिल यांनी गुंतवणूकदारांकडून जमा झालेली रक्कम विविध बँक खात्यांमधून वळवून स्वतःकडे घेतली होती. जानेवारी महिन्यात हैदराबादमधील एका व्यक्तीला या फसवणूक रॅकेटमध्ये 32 लाख रुपये गमवावे लागले होते.







