वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट

गावाच्या सुरक्षिततेसाठी युवकांची गस्ती पथके


| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण पूर्व विभागातील वाढत्या घरफोड्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. तालुक्यातील इतिहास प्रसिद्ध चिरनेर गावात मागील कित्येक दिवसांपासून चोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच आहे. चिरनेर ग्रामपंचायतीमार्फत उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून देखील चोरांवर नियंत्रण ठेवण्यात पोलीसांना उपयश येत आहे, अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास पोलीस यंत्रणा असमर्थ ठरत असल्याने स्वतःबरोबर स्वतःच्या गावाची सुरक्षा स्वतः करण्याची वेळ गावातील नागरिकांवर आली आहे. यासाठी चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या सुरक्षिततेसाठी गावातील तरुण युवकांचे ग्रुप तयार करून, गावातील मुख्य नाक्या नाक्यावर रात्री दहा वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत या तरुणांनी पहारा देण्यास सुरुवात केली आहे.

चिरनेर परिसरात बंद असलेली अनेक घरे फोडून, घरातील किमतीऐवज चोरून नेण्याचा धडाका कित्येक दिवसांपासून लावला आहे. चोरीमुळे येथील ग्रामस्थ हैराण झाले असून, त्यांच्यात घबराट निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना विनाकारण जागावे लागत आहे. दरम्यान, चिरनेर गावातील प्रमोद ठाकूर यांच्या बंगल्यात चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात असलेल्या सुरक्षारक्षकांनी आरडाओरडा करताच चोर पळून गेले. मात्र जाताना त्यांनी बंगल्याच्या काचा फोडल्या. तसेच मारुती म्हात्रे, कमलाकर केणी यांच्या घरात देखील चोरी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र घरातील माणसांनी प्रसंगावधान राखून, गस्त घालणाऱ्या गावातील युवकांना मोबाईलद्वारे संपर्क केला. चोरट्यांना गस्त घालणाऱ्या युवकांची चाहूल लागताच, चोरांनी काढता पाय घेतला. याआधी विंधणे, जासई, चिरले, धुतुम, बोकडविरा, नागाव या सारख्या गावात मोठ्या प्रमाणावर घरफोड्या झाल्या आहेत त्यामुळे येथील ग्रामस्थ हैराण झाले असून, त्यांच्यात घबराट निर्माण झाली आहे.

आम्ही सरपंचाबरोबर संपर्क साधून सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. तसेच पोलिसांची गस्त वाढविली आहे. लवकरच चोरांचा बंदोबस्त केला जाईल.

-सतीश निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण

पोलीस या चोरांचा बंदोबस्त करतील का? असा सवाल येथील नागरिकांमध्ये उपस्थित होत असून, वेळ पडल्यास पोलिसांनी गावातील तरुणांना सोबत घेऊन चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावातील तरुणांच्या गस्त पथकाने केली आहे.

समाधान रेवसकर व योगेश खारपाटील, चिरनेर गस्तप्रमुख



Exit mobile version