| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली शहरातील कारमेल स्कूल परिसरातील इंद्रप्रस्थ इमारतीत घडलेल्या 70 वर्षीय महेश्वरी पनीकर यांच्या निर्घृण हत्या या प्रकरणातील संशयित आरोपीला गोव्यातून ताब्यात घेण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे. यश थापा (21) रा. भानवज, खोपोली असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असून, पोलिसांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली.
दिवाळीच्या सणादरम्यान घडलेल्या या धक्कादायक घटनेने खोपोली शहर हादरले होते. महेश्वरी पनीकर यांचा त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. त्यांचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने हत्येचे गांभीर्य अधिक वाढले होते. याशिवाय घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची बाबही समोर आली होती. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खोपोली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढला. अखेर गोव्यातून यश थापा याला ताब्यात घेण्यात आले.
खोपोलीतील पनीकर हत्या प्रकरण; संशयित आरोपीला गोव्यातून अटक
