| सुतारवाडी | प्रतिनिधी |
भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत जमीन मालकांपैकी एक अभिमन्यू लडगे यांनी पत्रकारांना लेखी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सावरवाडी सुतारवाडी येथील गट नंबर 615 चे हद्द कायम करण्यासाठी भूमी अभिलेख रोहा यांच्याकडून जमीन मोजणीसाठी दि.16 नोव्हेंबर अशी तारीख दिली होती. अशा प्रकारचे पत्रकही त्यांनी दिले आहे. आपल्या जमिनीचे हद्द कुठपर्यंत आहे, ती कायम करण्यासाठी मुंबई, महाड व सुरत येथून स्थानिक जमीन मालक आले होते. मात्र, त्या दिवशी रोहा भूमी आलेख कार्यालयातून जमीन मोजणीसाठी कर्मचारी आला नाही. जमीन मोजण्यासाठी येणारा कर्मचारी अमित यादव यांना संबंधित ग्रामस्थांनी फोनद्वारे संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी आज रजेवर आहे. त्यामुळे मला येता येणार नाही. त्यामुळे बाहेरून आलेल्या जमीन मालकांना मोठा मनस्ताप निर्माण झाला. तसेच, गैरसमजामुळे बाचाबाची व शाब्दिक चमकही थोड्या प्रमाणावर झाली. वास्तविक भूमी अभिलेख खात्याने जमीन मोजण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची रजा मंजूर केली होती; तर, जमीन मोजण्यासाठी दि.16 नोव्हेंबर अशी तारीख दिलीच कशी? त्याच्या ठिकाणी दुसरा कर्मचारी जमीन मोजण्यासाठी का पाठवला नाही? जमीन मोजण्यासाठी अन्य शहरातून आलेल्या जमीन मालकांना मोठा भुर्दंड बसला, याला जबाबदार कोण, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडला असल्याचे अभिमन्यू लडगे यांनी पत्रकात म्हटले आहे.






