7 लाख 90 हजारांचे नुकसान
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड शिघ्रे ग्रामपंचायत हद्दी मधील वाणदे गावातील रहिवासी पंकज भुरे यांच्या मालकीचा शिघ्रे गावामध्ये पंकज फोटो स्टुडिओला शुक्रवारी (दि.2) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत स्टुडिओमधील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अंदाजे 7 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेच्या वेळी पंकज फोटो स्टुडिओचे मालक हे रोजच्या प्रमाणे दुपारी फोटो स्टुडिओ बंद करुन आपल्या निवासस्थानी जेवणासाठी गेले होते. दुकान बंद केल्यानंतर सुमारे पंधरा मिनिटांनी दुकानाला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर पंकज यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच ग्रामस्थ यांनी तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला.
मुरुड -जंजिरा नगरपरिषद कार्यालयामधील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. नागरिक आणि अग्निशामक दलाच्या प्रयत्नांमुळे ही आग वेळीच आटोक्यात आल्याने शेजारील घरांना आग लागण्यापासून बचाव झाला आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेची माहिती मुरूड तहसीलदार कार्यालयात कळविल्या नंतर पंचनामासाठी महसूल तलाठी विरुकुड मॅडम यांनी घटनास्थळी येऊन पंकज भुरे यांच्याशी संवाद साधून फोटो स्टुडिओची पाहणी केली. यामध्ये दोन संगणक, फोटो कॅमेरा, झेराक्स मशीन, व्हिडिओ कॅमेरा, पेपर, स्टुडिओ पडदे, खुर्ची विविध सामान अक्षरशः आगीत भस्मसात झाले असून सुमारे 7 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे पंकज भुरे यांच्या वर मोठे आर्थिक संकट कोसळलं आहे, तरी शासनाकडून लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
