पनवेल परिसर हादरला! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हत्येच्या घटना

| पनवेल | प्रतिनिधी |

रंगपंचमीचा उत्सव साजरा होत असताना कामोठे व तळोजा येथे दोन वेगवेगळ्या घटनेत दोन व्यक्तींवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यातील पहिली घटना कामोठे उपनगरात घडली तर दूसरी घटना तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये घडली. या घटनेतील मृतांची नावे राहुल बुमबक आणि राजू बासूमतारी असे आहे.

पहिली घटना कामोठे येथील सेक्टर 14 मधील गावदेवी मंदीराजवळ घडली असून, 23 वर्षीय राहुल बुमबक याचे लग्न झाले होते. स्वच्छतेचे काम करणाऱ्या राहुलच्या घराजवळ राहणारे त्याला ओळखणारे 19 वर्षीय गौरव पवार आणि प्रेम पेठकर यांची शुल्लक कारणावरून राहुलसोबत भांडण झाले होते. रंगपंचमी संपल्यावर राहुल गावदेवी मंदीराजवळील जांभळाच्या झाडाशेजारी उभा होता. यावेळी गौरव आणि प्रेम सुद्धा उभे होते. राहुल हा सतत का पाहतो या शुल्लक कारणावरून प्रेम याने राहुलला पकडून ठेवले काही क्षणात गौरव तेथे चाकू घेऊन आला आणि त्याने राहुलच्या पोटात वार केले. अति रक्तस्त्रावामुळे राहुलचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे आणि पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे, गणेश दळवी, अरविंद मसलकर, पोलीस हवालदार संजय झोळ व इतर पोलीस पथकाने गौरव आणि प्रेम यांना अटक केली.

दूसरी घटना तळोजा औद्योगिक वसाहतीमधील घोट गाव ते नितळस गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील प्लॉट क्रमांक टी 3 येथे रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सूमारास घडली. खैरणे गावात भाड्याने राहणारा आणि मूळचा आसाम राज्यातील राजू बासूमतारी (29) याला एका कंपनीच्या रखवालदाराने लोखंडी पाईपने डोक्यात प्रहार केल्याने त्याचा मृत्यू झाला. या रखवालदाराने का मारहाण केली याचा जाब विचारणाऱ्या अजून एका तरूणाला सुद्धा या रखवालदाराने मारहाण केली. राजू हा सायकलीने या रस्त्यावरून जात होता. रखवालदार मद्याच्या धुंदीत असल्याने त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या सायकलस्वार राजू आणि दुचाकीस्वारावर लोखंडी पाईपने हल्ला केला. यामध्ये राजू याचा मृत्यू झाला. तळोजा पोलिसांनी बुधवारी सकाळी संबंधित रखवालदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version