पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग अंतिम टप्प्यात

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

प्रवास होणार फक्त 40 मिनिटांत
पावसाळ्यानंतर प्रवाशांसाठी मार्ग खुला होण्याची शक्यता

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पनवेल ते कर्जतदरम्यान थेट रेल्वे प्रवास करण्याचे प्रवाशांचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) तर्फे हाती घेण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले असून, 2026 च्या पावसाळ्यानंतर हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सुमारे 29.6 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर नधळ, बावले आणि किरवली येथे तीन मोठे बोगदे उभारण्यात येत आहेत. यामधील बावले बोगदा हा सुमारे 2.63 किलोमीटर लांबीचा असून, तो मुंबई उपनगरीय रेल्वेतील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे.

या मार्गावर एकूण 47 पूल उभारण्यात आले असून त्यांचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पात अत्याधुनिक ‌‘बॅलास्टलेस ट्रॅक‌’ (खडीरहित रूळ) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.

फेब्रुवारी 2026 पर्यंत या प्रकल्पाचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले असून, चौक ते कर्जतदरम्यान रेल्वे इंजिनची चाचणीही यशस्वीरीत्या पार पडली आहे.
सुमारे 2,782 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या मार्गामुळे पनवेल ते कर्जत हे अंतर अवघ्या 40 मिनिटांत पार करता येणार आहे. सध्या रस्तेमार्गे हे अंतर पार करण्यासाठी सुमारे दीड तास लागतो.

या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मोठी मदत होणार असून, स्थानिक प्रवाशांसह उद्योग-व्यवसायालाही याचा फायदा होणार आहे.

Exit mobile version