पनवेल बाजारपेठ गणेशोत्सावासाठी सज्ज

सजावटीसाठी लागणाऱ्या विविध साहित्यांना मागणी

| पनवेल | वार्ताहर |

सध्या गणेशमूर्तीला अतिरिक्त सजावटीची मागणी वाढली आहे. विविध रंगांचे, पद्धतीचे फेटे, उपरणे, माळा, धोतर, हाताचे कडे अशा विविध आभुषणे मूर्तीवर सजावटीसाठी मागितली जात आहेत. अशा सजावट केलेल्या अनेक मूर्ती बाजारात पाहायला मिळत आहेत. दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवात गजबजणाऱ्या बाजारपेठा यंदाही गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सजावटीच्या विविध वस्तूंनी सजल्या आहेत. मात्र, या सर्व वस्तूंच्या खरेदीबरोबरच गणेशभक्तांकडून गणेशमूर्तीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या विविध साहित्यांची यंदा मोठी मागणी आहे.

मागील काही वर्षात गणेशभक्तांच्या मागणीनुसार, मूर्तिकारांनीदेखील वेगवेगळ्या स्वरूपात मूर्ती घडवण्यास सुरुवात केली आहे. सिंहासनावर, मूषकावर, गरुडावर आसनास्थ तसेच फेटा असलेल्या गणेशमूर्ती मूर्तिकार घडवत आहेत. मात्र, या मूर्तीनादेखील पुन्हा अतिरिक्त सजावटीची नागरिकांकडून मागणी वाढली आहे. यामध्ये गणेशमूर्तीसाठी नवीन पितांबर, उपरणे, शाल, धोतर यांसारख्या कापडी वस्तूंची मागणी केली जात आहे. यासाठी बोल्ड प्रिंट, एम्बॉस प्रिंट, फोईल प्रिंट अशा पद्धतीच्या गोष्टी वापरून गणपतीचे धोतर अधिक आकर्षक करण्याचा व्यापाऱ्यांकडून देखील प्रयत्न केला जात आहे. तसेच अनेक गणेशभक्तांकडून या सर्व गोष्टी सिल्कच्या कापडाच्या असाव्या, अशीही मागणी केली जात आहे. या कापडी वस्तूंबरोबरच मूर्तीच्या हातात बाजूबंद, मोत्यांचे कानातले, कपाळावर मोत्यांची टिकली यांसारख्या गोष्टींना देखील गणेशभक्त पसंती देताना दिसून येत आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट, जनता मार्केट येथील बाजारपेठा मखर, फुलांच्या माळा यांच्याबरोबरच मूर्तीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनीदेखील सजल्या आहेत.

Exit mobile version