| पनवेल | प्रतिनिधी ।
पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’ अंतर्गत तक्का पेट्रोल पंपासमोरील अनधिकृत होर्डिंग हटविण्याची कारवाई करण्यात आली. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार महापालिका क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलकांवर प्रभावी कारवाई करण्यात येत आहे.
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे तसेच उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. सहायक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी डॉ. रूपाली माने यांच्या नेतृत्वाखाली व प्रभाग अधीक्षक राजेश डोंगरे यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईसाठी प्रभाग समिती ‘ड’ मधील अतिक्रमण पथक, प्रभाग कार्यालयातील कर्मचारी, रायगड सुरक्षा रक्षक तसेच एमएसएफ सुरक्षा रक्षक यांच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली. अनधिकृत होर्डिंग हटविण्यासाठी एक मोठी क्रेन व एक हायड्रा यंत्राचा वापर करण्यात आला. महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्ज व अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत होर्डिंग अथवा जाहिरात फलक उभारू नयेत तसेच महानगरपालिकेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पनवेल महानगरपालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई
