| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
पालिका क्षेत्रातील फरशीपाडा, आडिवली, रोहिंजण आणि पेणधर येथील शाळांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित सुरू राहावे, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर वर्गखोल्या उपलब्ध करून घेण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या कामासाठी दोन वर्षांच्या कालावधीसाठी 24 लाख 60 हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय व आर्थिक मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे.
गट शिक्षण विभाग (बांधकाम), पंचायत समिती पनवेल यांनी महापालिकेकडे याबाबत मागणी केली आहे. त्यानुसार फरशीपाडा येथील शाळेला स्वतःची इमारत नसून आडिवली, रोहिंजण आणि पेणधर येथील शाळांच्या इमारती पनवेल महापालिकेने धोकादायक घोषित केल्या आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण अद्याप पूर्ण झाले नसल्याने विद्यार्थ्यांसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
प्रस्तावानुसार चारही शाळांसाठी एकूण 7,500 चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहे. फरशीपाडा आणि आडिवलीसाठी प्रत्येकी 1,000 चौरस फूट, रोहिंजणसाठी 1,500 चौरस फूट आणि पेणधरसाठी 5,000 चौरस फूट जागेची आवश्यकता आहे. या जागांसाठी दरमहा सुमारे 2 लाख 5 हजार रुपये भाडे अपेक्षित असून त्यानुसार दोन वर्षांचा एकूण खर्च 24 लाख 60 हजार रुपये इतका होणार आहे. सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून इच्छुक व्यक्ती व संस्थांकडून स्वारस्य अभिव्यक्ती तसेच निविदा मागविण्यात येणार आहेत. नगररचना विभागाकडून भाडेनिश्चिती केल्यानंतर सर्वात कमी भाडेदराच्या प्रस्तावास स्थायी समितीची मान्यता घेऊन जागा निश्चित केली जाणार आहे. महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून, मंजुरी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी तात्पुरत्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
पनवेल महापालिका घेणार वर्गखोल्या भाड्याने
