पनवेल रेल्वेस्थानक परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात

पालिकेच्या अतिक्रमण विभागाची चुप्पी
। नवीन पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल रेल्वेस्थानक परिसरात सिडकोने तात्पुरत्या स्वरुपात रोज बाजारासाठी मंगलमुर्ती रोज बाजार या संस्थेला जागा उपलब्ध करून दिली आहे. या रोजबाजारामध्ये टपर्‍या बसविलेल्या असून या टपर्‍यापुढे मोठ्या प्रमाणात जागेचे अतिक्रमण करुन बाकडे बसविले आहेत. या टपर्‍यामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उघड्यावर खाद्य पदार्थाची विक्री केली जाते. तसेच स्थानिक लोकप्रतिनीधीचे वरदहस्त व अतिक्रमण विभागातील अधिकारी त्यांच्या लागेबांध्यामुळे या परिसरात या फेरीवाल्यांनी येथिल फूटपाथवर कब्जा केला आहे. त्यामुळे पदपथावर चालणार्‍या नागरिकांना जीव मुठीत घेऊन येथून चालावे लागते.
नविन पनवेल रेल्वेस्थानका समोर मंगलमुर्ती रोज बाजाराने सर्व फुटपाथ बेकायदेशीर खाद्यपदार्थांचे स्टाल लावून फुटपाथवर कब्जा केला आहे .या खाद्य पदार्थाची सर्व घाण पाणी आजूबाजूच्या गटारात टाकताना दिसत आहेत. यामुळे या परिसरात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर निर्माण झाला आहे. या खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे महापालिकेचा कोणताही परवाना नसताना फूटपाथवर तसेच महावितरण सबस्टेशनच्याजवळ सर्रास गस सिलेंडरचा वापर करुन चायनिस भेळ, इडली सांबर, मिसळपाव, ज्यूस, भेळपूरी, चायनिज,वडापावची विक्री केली जाते.
याठिकाणी फूटपाथवर सांयकाळी वडापाव, चायनिज भेळपूरी खाण्यासाठी नागरिक गर्दी करत असून पदपथावर खुर्ची लावलेल्या असतात व पदपथावर कचरा टाकला जातो. कामोठे भोजनालयामध्ये आगीची दुर्घटना घडल्यानंतर महापालिका अधिकारी काही दिवसासाठी जागे झाले होते. त्यानी काही हाटेलवाल्यांना नोटीसा पाठवल्या होत्या. मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे परिस्थिति निर्माण झाली आहे. जे बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्री करतात यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे व्यापारी वर्ग नाराज आहे. यातील बहुतेक टपर्‍या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. असे येथील जेष्ठ नागरिक सांगत आहेत.

Exit mobile version