| पनवेल | प्रतिनिधी |
‘धर्मवीर’ या चित्रपटानंतर प्रसाद ओक पुन्हा एकदा सामाजिक विषयावर आधारित चित्रपटात झळकले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत नागराज मंजुळे यांचा भाऊ भूषण मंजुळेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. रोजबाजार करून आपल्या कुटुंबाचा गाडा खेचणाऱ्या लघु उद्योजकांच्या जीवनात राजकीय हस्तक्षेपामुळे घडणाऱ्या घटना आणि त्यानंतर होणारा उद्रेक आदी प्रसंग या चित्रपटातून समोर आणला आहे. महत्वाची बाब म्हणजे पनवेलमधील प्रेक्षकांना कल्पना नसताना अचानक या चित्रपटाच्या मुख्य नायिकेचे याठिकाणी आगमन घडवून आणण्यात आले होते. त्याचबरोबर या चित्रपटातील दोन्ही बाल कलाकारांना देखील याठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते.
‘रिलस्टार’ या चित्रपट निर्मिती टीमचे पनवेल प्रतिनिधी म्हणून राज भंडारी आणि दीपक परुळेकर यांनी हे आयोजन केले होते. यावेळी रिलस्टार चित्रपटाची नायिका प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला जगताप हिच्यासोबत चित्रपट पाहण्याचा आनंद पनवेलमधील उपस्थित प्रेक्षकांना अनुभवता आला. प्रसाद ओक या चित्रपटात एका पत्रकाराची भूमिका साकारत असून, प्रसिद्ध न्यायाधीशाच्या मृत्यूमागचे सत्य शोधण्याचा प्रयत्न करणारा तो पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अभिनय सादर करत आहे.
तसेच, रोज बाजार करणाऱ्या व्यवसायिकांना आपल्या जीवनात येणाऱ्या घटना, समस्या काय आहेत आणि त्यातून पुढे काय काय घडतंय हे दाखविण्याचा प्रयत्न लेखक महेंद्र पाटील यांनी केला आहे. या चित्रपटाची एक विशेष खासियत म्हणजे साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिम्मी रॉबिन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना मराठी आणि हिंदी भाषा अवगत नसतानाही त्यांनी मराठी चित्रपटासाठी आपले कौशल्य दाखविले आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी नंदू आचरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. यावेळी रिलस्टार चित्रपटाच्या अभिनेत्रीसोबत चित्रपट पाहून तिच्याशी हितगुज साधण्याची संधी दिल्याबद्दल पनवेलमधील रसिक प्रेक्षकांनी राज भंडारी आणि दीपक परुळेकर यांचे विशेष आभार मानले.
पनवेलकरांनी लुटला ‘रिलस्टार’ पाहण्याचा आनंद
