स्थानकात प्रवाशांची गर्दी; रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे
| खांदेश्वर | प्रतिनिधी |
हार्बर रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉकचा फटका पुन्हा एकदा पनवेल रेल्वे स्थानकातील प्रवाशांना बसत आहे. रविवारची सुट्टी आणि त्यात भाऊबीजेसाठी गावी गेलेले अनेक प्रवासी आज परतीच्या प्रवासाला निघाल्याने पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, स्थानक परिसरात प्रवाशांची धावपळ सुरू आहे.
दिवाळी सणानिमित्त अनेक नागरिक आपल्या कुटुंबीयांसह गावी गेले होते. भाऊबीजेचा सण रविवारी साजरा करण्यासाठी काही प्रवाशांनी आजचा दिवस परतीच्या प्रवासासाठी निवडला. त्यामुळे पनवेल रेल्वे स्थानकात सकाळपासूनच प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. अशा परिस्थितीत मेगा ब्लॉकमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. रेल्वेने प्रवास करायचा म्हटले तर मेगा ब्लॉकचा अडथळा आणि रस्त्याने जायचे म्हटले तर वाहतूक कोंडी, अशा दुहेरी संकटात प्रवासी सापडले आहेत. याचाच फायदा घेत काही रिक्षाचालकांकडून जादा भाडे आकारले जात असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. पनवेल ते वाशी या प्रवासासाठी तब्बल 100 रुपये भाडे सांगितले जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढणार हे माहीत असतानाही रेल्वे प्रशासनाकडून मेगा ब्लॉकचे नियोजन कसे केले जाते, असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत. वारंवार होणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या वेळेचा आणि पैशांचा अपव्यय होत आहे. रेल्वेच्या कामांसाठी मेगा ब्लॉक आवश्यक असला, तरी प्रवाशांना त्याचा त्रास कमी व्हावा यासाठी पर्यायी व्यवस्था का केली जात नाही? रिक्षाचालकांच्या मनमानी भाडे आकारणीवर नियंत्रण कोण ठेवणार? आणि सर्वसामान्य प्रवाशांची ही गैरसोय कधी संपणार? असे प्रश्न आता पनवेलकरांकडून उपस्थित केले जात आहेत.
