पनवेल – सायन महामार्ग एलईडीने उजळणार

महापालिकेचा 10 कोटींचा प्रस्ताव
। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेल-सायन महामार्गावरील बेलापूर ते कळंबोली यादरम्यानचे पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. येथील पिवळे म्हणजेच सोडियमचे दिवे बदलून त्या जागी एलईडी लावण्यात येणार आहेत. ही यंत्रणा पनवेल महापालिका हस्तांतरित करून घेणार असून पथदिवे आणि विद्युतीकरणाचे नूतनीकरण करणार आहे. यासाठी जवळपास 10 कोटी पाच लाखांचा खर्च अपेक्षित असून सर्वसाधारण सभेसमोर याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. विषयसूचीमध्ये त्याचा समावेश करण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

पनवेल-सायन महामार्गाचे विस्तारित काँक्रिटीकरण करण्यात आले असून या करिता बाराशे कोटी रुपये खर्च करण्यात आला. महामार्गावर पथदिव्यांसह इतर सुविधाही देण्यात आल्या आहेत. छोट्या वाहनांना टोलमधून सूट दिल्यामुळे त्याबदल्यात पनवेल टोल वेज कंपनीला पैसे न दिल्याने संबंधित एजन्सी बाहेर पडली. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

पनवेल-सायन महामार्गावरील पथदिवे देखभाल व दुरुस्तीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावेत, असे आदेश सरकारने दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवी मुंबईबरोबरच पनवेल पालिकेकडे पत्रव्यवहार करून पथदिवे वर्ग करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार भारती विद्यापीठ ते कळंबोली जंक्शन यादरम्यानचे पथदिवे देखभालीची जबाबदारी आता पनवेल महापालिकेकडे देण्यात आली आहे. यासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी पाठपुरावा केला. सामाजिक कार्यकर्त्या रंजना सडोलीकर यांनीही पत्रव्यवहार केला होता. अंधारामुळे दररोज पनवेल-सायन महामार्गावर अंधारामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत. काळोखाचा फायदा घेत कळंबोली, कामोठे बस थांब्यावर चोर्‍यांचे प्रकारही घडले आहेत.

पनवेल महापालिकेने पथदिवे हस्तांतरित करून घेऊन नूतनीकरणाचा आराखडा तयार केला आहे. तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला आहे. 20 जून रोजी होणार्‍या पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय विषय पत्रिकेमध्ये आणण्यात आला आहे. यावर चर्चा होऊन ठराव संमत केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच पनवेल सायन-महामार्गावर प्रकाशमय होण्याची शक्यता आहे.

सव्वा नऊशे एलईडी बसवणार
पनवेल-सायन महामार्गाचे नूतनीकरण करताना 267 पथदीप म्हणजेच खांब उभारण्यात आले होते. त्यावर सोडियमचे 918 दिवे बसविण्यात आले. मात्र महामार्गावर लख्ख प्रकाश पडावा, त्याचबरोबर वीज बिलामध्ये बचत व्हावी या उद्देशाने येथे एलईडी दिवे बसवण्यात येणार आहेत. याकरिता 10 कोटी 4 लाख 74 हजार 881 रुपये इतका खर्च येणार आहे. नवी मुंबई महापालिकेला दिल्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यासाठी आठ कोटी 29 लाख रुपये येणे अपेक्षित आहे; परंतु त्यासाठी विलंब होत असल्याने पनवेल पालिकेच्या अर्थसंकल्पातून या कामी खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही रक्कम मिळाल्यानंतर ती अर्थसंकल्पामध्ये वर्ग केली जाणार आहे. दोन कोटी 83 लाख रुपये इतका खर्च पाच वर्षांसाठी देखभाल करण्याकरिता येणार आहे. सात कोटी 21 लाख रुपये पथदिवे नूतनीकरणासाठी लागणार आहेत.

पथदिवे हस्तांतरित करून त्यांच्या नूतनीकरणाचा आराखडा तयार केला आहे. तसेच तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडून निधी उपलब्ध होण्याआधी महापालिकेच्या अर्थसंकल्पातून यासाठी खर्च करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. 20 जूनच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडला जाणार आहे.

– प्रीतम पाटील, विद्युत विभाग प्रमुख, पनवेल महापालिका

पनवेल ते सायन महामार्गावरील दिवे गेल्या काही महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे महामार्गावर अंधाराचे जाळे पसरून दररोज लहान-मोठे अपघात होत होते. यासंदर्भातील शेतकरी कामगार पक्ष व एका सामाजिक संस्थेने अखंडित पाठपुरावा केला. पनवेल महापालिकेकडून या ठिकाणी नवीन एलईडी दिवे बसवून त्याची पाच वर्षांकरीता निगा राखली जाणार आहे.

– अमोल शितोळे, शहराध्यक्ष, शेतकरी कामगार पक्ष, कामोठे
Exit mobile version