मुसळधार पावसाने पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवाशांसह चालक त्रस्त
। खांदा कॉलनी । प्रतिनिधी ।
मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेल येथील राज्य परिवहन (एसटी) डेपोच्या समस्या अनेक वर्षांपासून कायम असून, त्या अद्यापही सुटताना दिसत नाहीत. दररोज हजारो प्रवासी आणि शेकडो लालपरी बस या डेपोमधून ये-जा करत असतानाही येथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रवासी व चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डेपो परिसरातील रस्त्यांवर पुन्हा मोठमोठे खड्डे पडले असून, संपूर्ण परिसराची दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांमधून बस चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागत असून, बसच्या देखभालीचाही अतिरिक्त खर्च वाढत आहे.
डेपोमध्ये प्रवाशांसाठी स्वच्छ प्रतीक्षागृह, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था, स्वच्छतागृहे तसेच वाहनतळाची सुविधा अपुरी असल्याबद्दल प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे काही काळापूर्वी राज्याचे परिवहन मंत्र्यांनी स्वतः या डेपोची पाहणी करून लवकरच विकासकामे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही प्रत्यक्षात कोणतेही मोठे काम सुरू झालेले नाही.
पनवेल एसटी डेपो हा रायगड जिल्ह्यासह कोकण, मुंबई, पुणे आणि राज्यातील विविध भागांना जोडणारा महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी या डेपोचा वापर करतात. तरीही डेपोच्या दुरवस्थेकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याने डेपोचे तातडीने नूतनीकरण करून प्रवासी व चालकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवासी, वाहनचालक आणि नागरिकांकडून जोर धरत आहे.
