। पनवेल । वार्ताहर ।
एप्रिलमध्येच उन्हाळ्याची झळ अधिक कडक बसू लागली आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. म्हणूनच पनवेल पंचायत समितीने संभाव्य पाणीटंचाई कृती तयार केला असून, 54 गाव-वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव बनवला आहे. त्यासाठी 91 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पनवेल तालुक्यातील शिरढोण, कसळखंड, आपटा, वारदोली, मालढुंगे, वाजे, खैरवाडी, नानोशी, पाले बुद्रुक, नांदगाव, गुळसुंदे, वांगणी तर्फे वाजे, बारवई या ग्रामपंचायत हद्दीतील गाववाड्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव बनवण्यात आला आहे. तर, 44 गाववाड्यांसाठी विंधण विहिरींचा प्रस्ताव बनवण्यात आला असून त्यासाठी 49 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी शिरढोण, कसळखंड, वारदोली, मालढुंगे, खैरवाडी, सोमटणे, पोयंजे, खानाव, गुळसुंदे, नांदगाव, वांगणी तर्फे वाजे, नानोशी, शिरवली, नेरे, वलप, वाकडी, भाताण, उसर्ली खुर्द या ग्रामपंचायत हद्दीमध्ये विंधण विहिरींसाठीचा प्रस्ताव बनवण्यात आला आहे. मार्चपासूनच उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. ठिकठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीसोबतच या टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पाणीटंचाई आणखी तीव्र होण्यापूर्वी गाववाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा आणि विंधण विहिरी मंजूर करून त्या खोदण्याची मागणी केली जात आहे.