होप फाऊंडेशनच्या सुकन्या योजनेचा शुभारंभ
। महाड । प्रतिनिधी ।
आजच्या युगातील परिस्थितीमुळे मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित न ठेवता समाजाने त्यांच्या शिक्षणासाठी योगदान देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे मत दि अण्णासाहेब सावंत को. ऑप अर्बन बँकेच्या चेअरमन शोभा सावंत यांनी व्यक्त केले आहे. यावेळी होप फाऊंडेशनच्या सुकन्या योजनचा शुभारंभ देखील शोभा सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आजच्या विद्यार्थिनींच्या शिक्षणात होप फाऊंडेशनचे योगदान महत्त्वाचे आहे. ते उत्कृष्ट कार्य करीत आहे. त्यांनी तालुक्यातील 1 हजार सुकन्यांमध्ये मदत केली आहे, त्याचा आनंद आहे. होप फाऊंडेशनची टीम यशस्वीपणे पुढे जात आहे आणि गरजू विद्यार्थिनींसाठी ही योजना वरदान ठरत आहे. तसेच, शैक्षणिक साहित्याची मदत देणे हे या योजनेंतर्गत अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात दि अण्णासाहेब सावंत को. ऑप.अर्बन बँकचे चेअरमन शोभा सावंत यांच्यासह कोमसापचे जिल्हयाध्यक्ष सुधीर शेठ, ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, कोमसाप जिल्हा समन्वयक अ.वि. जंगम, बँकचे संचालक उदय बहुलेकर, कोमसाप महाड शाखा अध्यक्ष गंगाधर साळवी, होप फाऊंडेशनच्या सेक्रेटरी प्रियांका महाडीक, रोहिदास तरूण विकास मंडळाचे अध्यक्ष प्रविण चांदोरकर, उद्योजक संजय जगताप, आई सुकन्या योजनेच्या प्रमुख विजयालक्ष्मी जगताप, मिलन बहुलेकर,ज्योती खेडेकर, मुग्धा सागवेकर तसेच अक्षरशिल्पचे तज्ज्ञ मार्गदर्शक चंदन तोडणकर व प्रोजेक्ट मॅनेजर आदित्ये कासरूंग आदी मान्यवर उपस्थित होते.
महाड परिसरातील होप फाऊंडेशन ही संस्था गरजू विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरत असून या उपक्रमात आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे, असे होपच्या सेक्रेटरी प्रियांका महाडीक यांनी सांगून आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंगेश कंक यांनी केले. तर, हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता ऑफिस मॅनेजर अरूंधती मुतालिक, क्रिएटीव्ह हेड निशांत यांनी मोलाचे योगदान दिले.
सुकन्यांच्या शिक्षणाकरिता सहकार्य करा
सुकन्या दत्तक पालक योजना ही होप फाऊंडेशन संस्थेच्यावतीने राबविली जाणार असून, 500 सुकन्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप या शैक्षणिक वर्षात करण्यात येणार आहे. सुमारे 30 शाळांसह 5 जुनिअर व 2 सिनियर कॉलेजमध्ये ही योजना राबविण्यात येणार असून समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडावे व या उपक्रमात आर्थिक योगदान द्यावे. तसेच, महिलांनी आईचा डब्बा घेऊन या सुकन्यांच्या शिक्षणा करिता सहकार्य करावे, असे आवाहन नरेंद्र महाडीक यांनी केले.