जमिनींना अकृषिक सनद देणे भोवले
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांना अनियमितता केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी पनवेल तालुक्यातील काही गावांतील जमिनी औद्योगिक प्रयोजनासाठी खरेदी झाल्यानंतरही महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 चे कलम 63-एक-अ मधील तरतुदीचे पालन न करता जाणीवपूर्वक अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याची बाब शासनाच्या लक्षात आली. विजय पाटील यांनी या जमिनींना अकृषिक सनद देण्याची प्रक्रिया नियमबाह्य आणि अनियमित केली असल्याचा ठपका ठेवण्यात आला.
मेरेथॉन पनवेल इन्फास्ट्रक्चर प्रा.लि. यांनी पनवेल तालुक्यातील वारदोली, पोयंजे, भिंगारवाडी, भिंगार, पाली बुद्रुक व भेरले येथील जमिनी या महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 चे कलम 63 एक-अ मधील तरतुदीन्वये खऱ्या खुऱ्या औद्योगिक प्रयोजनासाठी सन 2007 मध्ये खरेदी केल्या होत्या. त्यामुळे सदर जमिनीवर कलम 63 एक-अ मधील तरतुदीन्वये कार्यवाही करणे अपेक्षित असताना, तहसीलदार विजय पाटील यांनी सदर बाबीकडे जाणीवपूर्वक अक्षम्य दुर्लक्ष करुन कलम 63 एक अ मधील तरतुदींचा भंग करुन सदर जमिनीना अकृषिक सनद देण्याची अनियमितता केल्याचा ठपका ठेवत विजय पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. पाटील यांची कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन करणारी असल्याने हे निलंबन करण्यात आले आहे. प्रस्तुत आदेश अंमलात असेपर्यंत विजय पाटील यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे असेल व त्यांनी जिल्हाधिकारी, रायगड यांच्या पूर्वसंमत्तीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये, असे या आदेशात म्हटले आहे.







