| पनवेल । वार्ताहर ।
स्वच्छता अभियान उपक्रमाअंतर्गत पनवेल महापालिका हद्दीतील विविध भिंती, उड्डाणपूल आदी ठिकाणी कचरा वर्गीकरण, स्वच्छतेचे फायदे याबाबत संदेश देणारी रंगीबेरंगी चित्रे रेखाटण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) विद्यार्थ्यांनी विनामोबादला साकारलेल्या या चित्रांमुळे नटलेली पनवेल नगरी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

केंद्र शासनाच्या वतीने राबवल्या जाणार्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्पर्धेमध्ये 1 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटामध्ये राज्य पातळीवर 34 शहरांमध्ये पनवेल महापालिकेला पाचवा क्रमांक आहे. कचरामुक्त शहरांसाठीचे थ्री स्टार व हागणदारीमुक्त शहराचा ओडीएफ प्लस दर्जा प्राप्त केला आहे. येत्या वर्षात पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षणात कामगिरी आखणी उंचावण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे.
याच अनुषंगाने पालिका हद्दीत स्वच्छतेची विविध कामे सुरू आहेत. यात एकीकडे पालिकेने रस्त्याच्या दुभाजकातील विद्युत खांबावर केलेली विद्युत रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे; तर दुसरीकडे शहरातील भिंतीवर आकर्षक चित्र काढून स्वच्छतेविषयी केलेली जनजागृतीदेखील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. या कामासाठी पनवेलमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रंगारी विभागातील सोळा विद्यार्थी 40 दिवसांपासून झटत आहेत.






