पनवेलच्या बाजारपेठा नाताळनिमित्त सजल्या

| पनवेल | प्रतिनिधी |

नाताळ हा सण सर्व जाती-धर्मातील नागरिकांकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विशेषकरून बच्चे कंपनीमध्ये या सणाचे विशेष आकर्षण असते. अवघ्या काही दिवसांवर नाताळ येऊन ठेपला असल्याने पनवेल परिसरातील विविध ठिकाणच्या बाजारपेठा सजावटीच्या साहित्यांनी सजल्या आहेत. ख्रिसमसनिमित्त होणाऱ्या सेलिब्रेशनची आतापासूनच जय्यत तयारी सुरु झाल्याचे दिसत आहे.

नाताळ जवळ आल्याने शहरांतील बाजारपेठा, दुकाने व मॉल्स ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी लाईट्स, बेल्स, स्टार्स, सांताच्या टोप्या, केक, सजावटीच्या वस्तू आदी साहित्यांनी सजल्या आहेत. यानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे. सध्यास्थितीत बाजारपेठेत सजावटीच्या वस्तूंमध्ये विविध आकारांचे ख्रिसमस ट्री, जिंगल बेल्स, विद्युत माळा (लाईट्स), स्टार्स, टिनसेल, बॉल्स आणि स्टॉकिंग्ज, ख्रिस्त जन्माचे साहित्य, मुखवटे आणि सांताक्लॉजच्या टोप्या दाखल झाल्या आहेत. तसेच खाद्यपदार्थांमध्ये विविध फ्लेवर्सचे केक, विशेषतः प्लम केकचीमागणी जास्त असते. त्यामुळे हे केक उपलब्ध करून देण्यावर दुकानदारांकडून भर दिला जात आहे. विशेषकरून लहान मुलांसाठी बाजारात सांताक्लॉजसारखे ड्रेस, कानटोपी, ग्लोज, शूज, पोतडी बॅग्जही आल्या आहेत. बच्चे कंपनीत सांताक्लॉजचे खास आकर्षण असल्याने चॉकलेट गिफ्ट घेऊन येणाऱ्या सांताक्लॉजचे आकर्षक मुखवटे, टोपी यांची खरेदी आतापासून होतांना दिसत आहे. काही ठिकाणी साहित्याच्या किंमतीत वाढ झाली आहे, तरीही उत्साहामुळे खरेदी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version