प्रेमी युगुलांच्या उच्छादामुळे नागरिक त्रस्त
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहराच्या शिरपेचातील मानाचा तुरा समजला जाणारा ऐतिहासिक ‘वडाळे तलाव’ सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून सौंदर्याने नटवलेल्या या तलावाच्या परिसरात सध्या प्रेमी युगुलांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, त्यांच्या अश्लील चाळ्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना येथून चालणेही कठीण झाले आहे.
वडाळे तलाव हा पनवेल आणि परिसरातील नागरिकांसाठी मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. सकाळ-संध्याकाळ आबालवृद्ध येथे विरंगुळा म्हणून आणि व्यायामासाठी येत असतात. लहान मुलांसाठी खेळणी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची उत्तम सोय असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. मात्र, गेल्या काही काळापासून या सौंदर्याला अश्लीलतेचे गालबोट लागले आहे. तलावाच्या काठावर आणि बागेत प्रेमी युगुलांची मोठी गर्दी असते. मात्र, ही युगुलं सार्वजनिक ठिकाणाचे भान न राखता खुलेआम अश्लील चाळे करताना दिसतात.
विशेष म्हणजे, परिसरात सुरक्षारक्षक तैनात असूनही त्यांच्यावर कोणाचाही धाक उरलेला नाही. सुरक्षारक्षक अनेकदा याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना हटकले तरी ही मुले जुमानत नसल्याचे चित्र आहे. येथून ये-जा करणाऱ्या महिला आणि कुटुंबासोबत येणाऱ्या नागरिकांना या दृश्यांमुळे मान खाली घालावी लागत आहे. “आम्ही मुलांना घेऊन या ठिकाणी फिरायला येतो, पण येथील वातावरण पाहून मुलांवर काय संस्कार होणार? असा प्रश्न पडतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली. अनेकदा नागरिकांना येथून जाताना लज्जास्पद वाटते, ज्यामुळे येथील गर्दी आता ओसरू लागली आहे. शहराचे सौंदर्य वाढवणाऱ्या या प्रेक्षणीय स्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी पोलिसांनी आणि महानगरपालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. केवळ सुरक्षारक्षक नेमून उपयोग नाही, तर अशा टवाळखोरांवर आणि अश्लील चाळे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
