धेरंड परिसरात उभारणार पेपर प्रकल्प; 20 हजार कोटींची गुंतवणूक

| मुंबई | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात सिनारमन्स पल्प या कागद निर्मितीच्या 20 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या उद्योगासह अन्य उद्योग प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली. अलिबाग तालुक्यातील धेरंड येथे या प्रकल्पासाठी यापूर्वीच 300 एकर जागा देण्यात आली असून, प्रकल्पाच्या मागणीनुसार अधिकची जागा देण्याचा शासनाचा मानस आहे. प्रकल्पस्थळ आणि परिसरात मोठया प्रमाणावर वाढणारे उद्योग आणि होणारी रोजगार निर्मिती लक्षात घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीने प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मान्यता देऊन देशातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प इथे आणण्यात यश मिळवले आहे.

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना करण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक तब्बल 14 महिन्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत चर्चा झाली.

सिनारमन्स पल्प या कागद प्रकल्पातून टिश्यू, पॅकेजिंगच्या कागदाची निर्मिती केली जाणार आहे. या पेपरना जगभरात 150 देशांमध्ये मागणी आहे. इंडोनेशियास्थित सिनारमन्स कंपनी आणि आशिया पेपर यांच्या संयुक्त भागिदारीतून हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

या बैठकीत उद्योगांसंबंधीचे अन्य महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. कोरोना टाळेबंदीच्या काळात राज्यातील ज्या उद्योगांना परताव्याचे दावे दाखल करता आले नाहीत, त्यांचे असे दावे मंजूर करण्यासाठी औद्योगिक प्रोत्साहन अनुदान योजनेचा कालावधी दोन वर्षांनी वाढविण्यात आला. उद्योगांना मार्च 2020 ते डिसेंबर 2022 असा दोन वर्षांसाठी औद्योगिक प्रोत्साहन अनुदानासाठी कालावधी वाढवून देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील अनेक उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Exit mobile version