जेएनपीटी बंदरात अडकला कागद

14 दिवसांपासून 4000 कंटेनर अडकून पडलेत; वृत्तपत्र, छपाई व्यवसाय अडचणीत

| चिरनेर | प्रतिनिधी |

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आता कमी अधिक प्रमाणात नियंत्रणात आली असल्याने उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरात परदेशातुन राज्यातील वृत्तपत्रांसाठी लागणाऱ्या कागदांचे आयात करण्यात आलेले आहे. मात्र, मागील 14 दिवसांपासून सुमारे 4 हजार कंटेनर जेएनपीटी बंदरात अडकून पडले आहेत. या अडकलेल्या कंटेनरमध्ये 460 कोटी किंमतीचा 1 लाख टन कागद आहे. त्यामुळे राज्यातील वृत्तपत्र व छपाई व्यवसाय अडचणीत सापडला आहे. जेएनपीए अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला असून, वाहनचालकांच्या तुटवड्यामुळे ही वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आता कमी अधिक प्रमाणात नियंत्रणात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध छपाई कंपन्यांच्या माध्यमातून परदेशातुन वृत्तपत्र छपाईसाठी रशिया, कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, आफ्रिका, युरोपातुन कागद आयात करण्यात आलेला आहे. मात्र, कोट्यवधींचा छपाईचा कागद जेएनपीए बंदरात मागील 14 दिवसांपासून अडकून पडलेला आहे. जेएनपीए अंतर्गत बंदरातील कंटेनर वाहतूक करणारी यंत्रणा कोलमडल्यानेच ही वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे मात्र राज्यातील वृत्तपत्र छपाई करणाऱ्या कंपन्या अडचणीत सापडलेल्या आहेत.

जेएनपीटी बंदरातील विविध सीआयएफएसमध्ये काम करणारे सुमारे 2 हजार कंटेनर ट्रेलरवरील वाहनचालक दोन महिन्यांपासून पश्चिम बंगाल, युपी, बिहार निवडणुकीच्या कामासाठी राज्यात गेले आहेत. वाहनचालकांना निवडणुकीनंतर माघारी येण्यास विलंब होत चालला आहे. या विलंबामुळे कागदाचे आयात करण्यात आलेले सुमारे 4 हजार कंटेनर अडकून पडले असल्याची कबुली जेएनपीएचे कंटेनर वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी गिरीश थॉमस यांनी यांनी दिली आहे. जेएनपीएने अडकून पडलेले कागदी मालाचे आयात कंटेनर बंदराबाहेर काढण्यासाठी तुर्तास अतिरिक्त वाहनचालकांची व्यवस्था केली आहे. येत्या 25 मे पर्यंत वृत्तपत्र कागदाचे कंटेनर बंदराबाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी प्राधान्य दिले जाणार असल्याचेही थॉमस यांनी सांगितले.


जेएनपीए बंदरात परदेशातुन विविध कंपन्यांच्या माध्यमातून वृत्तपत्र छपाईसाठी आयात करण्यात आलेले सुमारे 4 हजार कंटेनर मागील 14 दिवसांपासून अडकून पडले आहेत. या कंटेनरमधुन 1 लाख टन आणि 460 कोटी किंमतीचा कागद बंदरात अडकून पडलेला आहे. अडकलेले कंटेनर बंदराबाहेर काढून विविध सीआयएफएसमध्ये पाठविण्यासाठी बंदर प्रशासनाला साकडे घातले आहे. मात्र, कंटेनर बाहेर काढण्याचे काम अद्यापही संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वृत्तपत्र व छपाई व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

कैलास आवटे,
ऑपरेशन हेड, टायटॅनिक ओशिएन सर्व्हिसेस
Exit mobile version