कस्टमच्या धाडीनंतर धक्कादायक सत्य समोर; 290 किलो अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न
। उरण । विठ्ठल ममताबादे ।
उरणमधील जेएनपीटी बंदरात अनेकदा अवैध मार्गाने आलेल्या वस्तू, पदार्थ कस्टम विभागाने पकडले आहेत. आता कस्टम विभागाला अवैधरित्या बंदरात उतरविलेली टॅल्कम पावडर पकडण्यात मोठे यश आले आहे.
उरणच्या जेएनपीटी बंदराच्या परिसरात कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत एक धक्कादायक प्रकार समोर आला. याठिकाणी टॅल्कम पावडरचा साठा असलेला एक कंटेनर ठेवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर या कंटेनरमध्ये 290 किलो अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महसूल गुप्तवार्ता संचलनालय या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हेरॉईनची मोठी तस्करी सागरी मार्गाने भारतामध्ये आणली जाणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यानंतर या हेरॉईनचे मुंबई आणि दिल्लीत वितरण करण्यात येईल, अशीही खबर मिळाली होती. या माहितीच्या आधारे कस्टम विभागाने जेएनपीटी बंदराच्या परिसरात कारवाई केली.
यावेळी इराणमधील टॅल्कम पावडरचा एक कंटेनर जेएनपीटी बंदरात उतरवण्यात आल्याचे कस्टम विभागाच्या निदर्शनास आले. हा कंटेनर सीएफएसमध्ये (कंटेनर फ्रंट स्टेशन्स) ठेवण्यात आला होता. कस्टम विभागाच्या अधिकार्यांनी हा कंटेनर उघडून तपासणी केली असता त्यामध्ये अफगाणिस्तानमधून आणलेले 290 किलो हेरॉईन आढळले. हा सर्व साठा कस्टम विभागाकडून जप्त करण्यात आला असून पुढील चौकशी सुरु आहे.