नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली पुनर्वसनाच्या हालचाली सुरु
उपसरपंच आणि ग्रामसेविका झिराडकर यांची हातमिळवणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मिठागरमधील अनेकांना बेघर करण्याचा घाट प्रशासनाचा सुरु झाला आहे. नैसर्गिक आपत्ती, दरड कोसळण्याच्या नावाखाली 30 हून अधिक घरांचे पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उपसरपंच मंदा ठाकूर यांच्यासह विजय ठाकूर व ग्रामसेविका नेहा झिराडकर यांची हात मिळवणी असल्याचा आरोप करण्यात आला असून घर मालकींची कोणतीही संमती न घेता हा कारभार सुरु असल्याचा प्रकार महेश ठाकूर यांनी माहितीच्या अधिकारात उघड झाला आहे. खामदे आणि सावली येथील घरांचे स्थलांतरित करण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
सामाजिक कार्यकर्ते महेश ठाकूर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, मुरूड तालुक्यातील मिठागर हे गाव असून 280 घरांची वस्ती असलेले गाव आहे. या घरांपैकी 30हून अधिक घरे डोंगर भागालगत आहेत. मात्र या घर मालकांची संमती न घेता, या घरांतील नागरिकांचे पुनर्वसन करण्याच्या हालचाली मंदा ठाकूर, विजय ठाकूर यांनी केल्या आहेत. त्यात त्यांना ग्रामसेविका नेहा झिराडकर मदत करीत आहेत.
कष्टाने बांधलेल्या या घरांचे पूनर्वसन करण्याच्या हालचाली उपसरपंच मंदा ठाकूर यांच्यासह विजय ठाकूर यांच्या माध्यमातून सुरु झाल्या आहेत. मिठागर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष असलेले विजय ठाकूर यांनी अलिबागचे उपविभागीय अधिकारी यांना पत्र देऊन डोंगरालगत असलेल्या घरांना तडे गेले आहेत, तेथील घरांवर दरड कोसळून वित्त व जीवीतहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 69 जणांच्या घराचे पुनर्वसन होणे आवश्यक असून पर्यायी जागा म्हणून उसरोली येथे पर्यायी जागा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र याबाब घरमालकांची कोणताही संमती घेण्यात आली नाही. पुनर्वसन व स्थलांतराच्या नावाखाली येथील नागरिकांना बेघर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महेश ठाकूर यांनी केला आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाकडे पुनर्वसनासाठी पाठपुरावा ही मंडळी करीत आहेत. गावे स्थलांतरीत होण्यासाठी करण्यात आलेले पत्रव्यवहार खोटे आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी. उपसरपंचसह विजय ठाकूर, ग्रामसेविका नेहा झिराडकर यांच्या विरोधात गून्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. गावांतील लोकांची व शासनाची दिशाभूल करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी महेश ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.




