मुंबई | प्रतिनिधी |
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात तब्बल 100 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. तसेच, आपण किरीट सोमय्यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती अनिल परब यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे. दापोलीमध्ये अनिल परब यांचे अवैध रिसॉर्ट असल्याचा देखील आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.
अनिल परब यांच्यावर देखील दापोलीमधील रिसॉर्टवरून त्यांनी आरोप केल्यानंतर त्यावर अनिल परब यांनी त्यांना 72 तासांत माफी मागण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यांनी माफी न मागितल्यामुळे आता अनिल परब यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान अनिल परब यांनी या याचिकेमध्ये 100 कोटींसोबतच किरीट सोमय्यांकडून विनाअट माफीची मागणी केली आहे. त्याचसोबत ही माफी त्यांनी दोन वर्तमानपत्रांमध्ये छापून आणावी आणि त्यांच्या ट्वीटर हँडलवर न्यायालय ठरवेल तेवढा काळ ही माफी ठेवावी, अशी देखील मागणी अनिल परब यांनी केली आहे.