तरुणांनी फुलवले माळरानावर नंदनवन

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यातील पन्हेळी गावातील रमेश शिंदे व महेश चोरगे या दोन युवा शेतकऱ्यांनी पाच एकर क्षेत्रावर माळरान जागेवरती कलिंगड लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. कृषी विभागाच्या सहकार्याने वनराई बंधाऱ्याद्वारे त्यांनी कलीगड व भाजीपाला लागवडीसाठी पाण्याची सोय केली. या तरुणांनी कोरोनाकाळात नोकरी गमावल्यामुळे मुंबईहून गावी परतले. त्यानंतर दोघांनी पुन्हा मुंबईत न जाता गावीच राहण्याचा व शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाची कृषी विभाकडून माहिती घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शेतीमधील माहिती कमी असल्याने अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु, त्यावर मात करून कृषी विभागाच्या सहकार्याने शेती क्षेत्रात यशस्वी नाविन्यपूर्ण प्रयोग केले.

दोन्ही शेतकरी स्वतःच्या सोबतच गावातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करीत त्यांनी चालू वर्षी माळरानावरती वनराई बंधारा बांधुन कलिंगड पिकाच्या 8000 रोपांची लागवड केली. तसेच इतर भाजीपाला सुद्धा केला. यासाठी त्यांनी आतापर्यंत सव्वा ते दीड लाखांचा खर्च केला आहे. कलिंगड पिकांमधून त्यांना 80 ते 100 टन इतक्या उत्पादनाची अपेक्षा आहे. खर्च वजा करता चार ते पाच लाखपर्यंत निव्वळ नफा अपेक्षित आहे. भाजीपाला उत्पादन घेण्यासाठी कृषी सहायक दिनेश चांदोरकर व कृषी विभागाचे इतर अधिकाऱ्यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे.

Exit mobile version