| परभणी | प्रतिनिधी |
परभणीच्या सोनपेठ शहरात एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील बालवाडीतील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
बदलापूर येथील शाळेत चिमुकलीवर शाळेतच लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच सोनपेठ शहरातील एका नामवंत इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनपेठ शहरातील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिकणारी चिमुकली शाळा सुटल्यावर तिच्या घरी गेली असता तिच्या अंगावर ओरखडे पाहून तिच्या आईने तिची विचारपूस केली. त्यानंतर तिच्या पालकांनी तिला दवाखान्यात नेले. त्यानंतर वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी सदरील चिमुकलीच्या पालकांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी त्यांच्या बाजूच्या गावातीलच एका आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. याबाबत सोनपेठ पोलिसांनी आरोपी विरुद्ध बालकांचा लैंगिक अत्याचार कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक अशोक घोरबंड पोलीस निरीक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांनी शाळेला भेट देऊन शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. शाळेने सर्व चोपन्न सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे दहा दिवसांचे फुटेज पोलिसांना दिले आहे. या प्रकरणाचा तपास सोनपेठ येथील पोलीस निरीक्षक सुर्यमोहन बोलमवाड हे करीत आहेत.