| नवी मुंबई | वार्ताहर |
तळोजा जेलमध्ये इमारत दुर्घटना गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात ताबा न घेण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम (55) वर्ष यांनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. मंगळवारी (दि.8) रात्री साडेदहा वाजता उलवे वाहळ गावात कदम राहत असलेल्य इमारती खाली तक्रादारकडून साडेतीन लाख रुपये घेताना मुंबई एसीबी पथकाच्या जाळ्यात अडकले.
याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घराची आणि कार्यालयाची झडती घेतली असता 48 लाख रूपयांची रोकड मिळून आली. तक्रारदारच्या वडीलांविरोधात एनआरआय सागरी पोलीस ठाणे नवी मुंबई या ठिकाणी शाहबाज गावातील इमारत पडली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये ते सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या आरोपी विरूध्द एनआरआय पोलीस ठाण्यात 2 ऑक्टोबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात ताबा न घेण्याकरिता व अटक न करण्यासाठी तसेच गुन्ह्यामध्ये मदतीसाठी पीआय सतीश कदम यांनी 5 लाख रकमेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदार यांनी पीआय सतीश कदम यांची एसीबी मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार मंगळवारी (दि.8) ऑक्टोबर रोजी केली. त्याच दिवशी एसीबीने पंचाच्यासमक्ष पडताळणी केली असता पडताळणीमध्ये पीआय सतीश कदम यांनी तळजोडीअंती चार लाख रुपयांची मागणी केली. ही लाचेची रक्कम त्याच दिवशी रात्री दहा वाजता ते राहत असलेल्या इमारती जवळ आणून देण्याचे सांगितले. त्यावरून सापळा रचून साडे तीन लाख रुपये घेताना एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश संभाजी कदम यांना ते राहत असलेल्या इमारती खाली रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी एसीपी श्रीमती सरिता भोसले एसीबी मुंबई यांच्या पथकाने केली.
लाचखोर पीआयची संपती
नवी मुंबई एसीबी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने बुधवारी सकाळपासून सतीश कदम यांच्या सदनिका क्र.701 व 705, ऑर्चिड हाइट्स, सेक्टर 23 उलवे घराची झडती घेतली. यावेळी मिळून आलेली. मालमत्ता-
1. सदनिका 705, ऑर्चिड हाइट्स, सेक्टर 23 उलवे नवी मुंबई ही लोकसेवक सतीश कदम यांच्या नावे सन 2017 मध्ये खरेदी
2. सदनिका 701, ऑर्चिड हाइट्स, सेक्टर 23 उलवे नवी मुंबई ही लोकसेवक सतीश कदम व नीता सतीश कदम यांच्या नावे सन 2019 मध्ये खरेदी
3. तुलसी वेदांत इंटरप्राईजेस एलएलपी यांच्यावतीने निता कदम व प्रेम कदम यांच्या नावे क्रमांक सात भूखंड क्रमांक 474 सेक्टर 25 पुस्तक वहाळ तालुका पनवेल हा सुमारे 170 चौरस मीटर क्षेत्रफळाचे भूखंड ट्रॅक्टर नोंदणी.
घरातील वस्तूंची किंमत
1. सदनिका क्रमांक 705 मध्ये 3,39,350/- रु. किमतीचे घरगुती सामान मिळून आले आहे
2. सदनिका क्रमांक 701 मध्ये 82,100/- रु. किमतीचे घरगुती सामान मिळून आले आहे 3. 48,00,000/ रू. रोख रक्कम
वाहन
1) सतीश कदम यांचे नावे मारुती सुझुकी सेलेरिओ कार 2) नीता कदम यांचे नावे हुंडाई वेरना कार 3) मुलगा प्रेम कदम यांचे नावे ऑडी ए-६ कार, सोने 245 ग्रॅम