पालक माता, विद्यार्थी संवाद कार्यक्रम

| नेरळ | प्रतिनिधी |

संस्कारमय शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेरळ गावातील विद्या विकास मंदिर शाळेत विद्यार्थी आणि त्यांचे पालक असलेल्या माता यांच्या संवाद साधण्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. मातृदिनाच्या निमित्ताने आगळावेगळा कार्यक्रम विद्या मंदिर मंडळाने सादर करून पालक वर्गाची संस्थेबद्दल जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

कर्जत तालुक्यातील नेरळ येथील विद्या विकास मंडळ संचालित विद्या विकास मंदिर या शाळेत मातृदिनाचा समारंभ शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत भारतीय संस्कृती आणि संस्कार यांचे महत्व विविध कार्यक्रमातून दर्शविण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या मातेप्रती असलेल्या भावना आणि प्रेम आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या मातांचे औक्षण करून त्यांना वंदन केले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. औक्षण कार्यक्रमानंतर आई आणि मुलांच्या खेळांचा आनंद घेतला. यात मुलांनी आईच्या कपाळावर टिकली लावणे, आईने ग्लासात फुगा फुगवून तो मुलांकडे पास करणे आणि गाण्यांच्या तालावर नृत्य करत गाणे थांबले की बॉटल उचलणे असे मनोरंजक खेळ खेळले. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अर्चना पाटील तसेच कार्यक्रमाचे नियोजन अलका देवघरे, सायली गंध्रे, वर्षा हिवाळे, दिपिका घाटे, राजश्री काळे, प्रियांका दहिववलीकर यांनी केले. तर परीक्षक म्हणून रोहिणी बोराडे आणि हिना राठोड यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या नियोजनात करोटे, भारती पळसकर, विनया पांचाळ आणि मनाली पाटील यांनी सहभाग घेतला.

Exit mobile version