गुरुकुलवर कारवाईस विलंब; शिक्षण अधिकार्‍यांवर पालक नाराज

संतोष पाटील । पेण ।
पेण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून गटशिक्षण अधिकारी अरूणादेवी मोरे यांनी गुरुवार दि.21 जुलै रोजी पी.एस.एम.एस. इंग्लिश मिडियम स्कूल, पेण (गुरूकूल) या संस्थेने केलेल्या कृत्याचा अहवाल शिक्षण अधिकारी (प्राथमिक) पुनीता गुरव यांच्याकडे पाठविला आहे. मात्र त्यावर कारवाई करण्यास विलंब होत असल्याने पालकवर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

शिक्षणाधिकार्‍यांना पाठविलेल्या अहवालात  आरटीई   अंतर्गत येणार्‍या सवलतधारक मुलांचे पैसे परत न केल्याबाबत तसेच शासन नियमात नसताना देखील या संस्थेने स्वतःच्या मर्जीने खासगी लिड अ‍ॅप पालकांचा विरोध असताना सुरु केला असून, त्याबदल्यात पालकांकडून 3600 रुपये घेतले आहेत असे नोंदवले आहे. याखेरीज वारंवार सांगून देखील लिड अ‍ॅप बंद केला नाही, त्याचप्रमाणे दहावीच्या मुलांसाठी शिक्षण संस्थेच्याच संकुलामध्ये खासगी क्लासेस चालू करुन पालकांजवळून जास्तीचे 4000 रुपये घेतले आहेत. या सर्व बाबी गटशिक्षण अधिकार्‍यांनी नमुद केल्या आहेत, असे समजले.

 संस्थेने 2015 पासून आरटीईचा लाभ मिळालेल्या 643 मुलांचे पैसे परत केलेले नाहीत. असे असताना देखील संस्थेवर शिक्षण अधिकार्‍यांकडून कारवाईसाठी दिरंगाई होत आहे. या 643 मुलांमध्ये अनेक पालक असेही आहेत की, ज्यांची आर्थिक कुवत नसताना देखील शाळेच्या चुकीच्या धोरणामुळे प्रत्येक वर्षी फी भरावी लागत आहे. काही मागासवर्गीय (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती) विद्यार्थ्यांचा देखील त्यात समावेश आहे. परंतु अधिकारीवर्गाकडून ज्या प्रकारे तपास व्हायला हवा त्याप्रकारे तपास होत नसल्याने पी.एस.एम.एस इंग्लिश मिडियम स्कूलविरुध्द कारवाई होण्यास दिरंगाई होत आहे, असा आरोप होत आहे.

22 जुलै 2022 रोजी शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांना प्रत्यक्ष आमचे प्रतिनिधी भेटून सदरील संस्थेबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पेण गटशिक्षण अधिकार्‍यांकडून रिपोर्ट आल्यानंतर त्यावर कारवाई केली जाईल. त्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी भ्रमणध्वनीवरून दोन वेळा संपर्क केला. परंतु, शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांचे ठरलेले उत्तर माझ्याकडे अजून पेण पंचायत समितीकडून रिपोर्ट आला नाही. मात्र, पेण पंचायत समितीकडून प्राथमिक अहवाल 14 जुलै रोजी तर दुसरा अहवाल 21 जुलै रोजी जिल्हापरिषदेकडे गेला असल्याचे कळते.

एकतर शिक्षण अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. अथवा त्यांचे कनिष्ठ कर्मचारी त्यांना पेण पंचायत समितीकडून आलेली माहिती पुरवत नाहीत, असे बोलले जात आहे. शिक्षण अधिकार्‍यांच्या भुमिकेमुळे पालक वर्ग शिक्षण अधिकार्‍यांच्या विरुध्द नाराजी व्यक्त करत आहेत. याबाबत तीन ऑगस्टला  सकाळी 11 वाजून 41 मिनिटांनी शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करून पी.एस.एम.एस संस्थेच्या बाबत कोणती कारवाई केली अशी विचारणा केली असता, त्यांनी यावेळेला देखील पेण पंचायत समितीतून रिपोर्ट आला नाही असे सांगितले. मात्र, प्रस्तुत  प्रतिनिधींनी 22 जुलैलाच पेण पंचायत समितीतून अहवाल गेल्याचे निदर्शनास आणताच गुरव यांनी मी माझ्या कर्मचार्‍यांना विचारून सांगते.असे सांगितले. मात्र, शिक्षण अधिकार्‍यांनी ना स्वत:हून फोन केला ना आमच्या प्रतिनिधीचा फोन घेतला. 

Exit mobile version