| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी-मोहोपाडा येथील एका शाळेत गैरव्यवहार सुरू असून, शाळा अनुदानित असतानाही विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे फी वसूल करून शासन आणि पालकांची फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप संस्थेचे कार्याध्यक्ष अरुण शांताराम गायकवाड, आकाश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
शाळेची सध्याची इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. म्हणजे, कागदोपत्री शाळेला परवानगी पराडे वाडी येथील दोन खोल्यांसाठी असताना, शाळा प्रत्यक्षात मोहोपाडा येथे विनापरवाना चालवली जात आहे. वाढीव तुकड्यांनाही कोणतीही परवानगी नसताना शाळा बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. संस्थेने आदिवासी विद्यार्थ्यांनाही मोफत शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. समाजाची फसवणूक टाळण्यासाठी गायकवाड यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी यांच्यावरही जबाबदारी निश्चित करून, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल करावेत आणि विद्यार्थ्यांकडून घेतलेली फी व्याजासहित परत करावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अरुण गायकवाड, आकाश कांबळे यांच्यासह अरविंद पाटील, विजय खारकर, आशिष जाधव तसेच काही पालकांनी दिला आहे.






