शाळांमध्ये होणार माता-पालक मेळावा

| रायगड | प्रतिनिधी |

राज्यातील शिक्षकांचे काम थांबता थांबत नाही, अशी ओरड शिक्षक नेते नेहमी करीत असतात. व मतदार यादी या कामातून कधी एकदा सुटका होणार, या चिंतेतील शिक्षक एका नव्या जबाबदारीस आता सामोरे जाणार आहे. हे पण काम महत्वाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

माता पालक मेळावा
राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षापासून माता-पालक शैक्षणिक मेळावाहे अभियान सामाजिक चळवळीच्या रूपात राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयाने घेतला आहे. शिक्षण आयुक्त यांनी यासंदर्भातील सविस्तर आदेश जारी केले असून राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांना अंमलबजावणीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि केंद्र सरकारच्या निपुण भारत अभियानांतर्गत इयत्ता दुसरीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

सर्वांगीण विकास हे ध्येय
बालकाच्या सुरुवातीच्या वर्षांत त्याच्या सर्वांगीण विकासाची खरी पायाभरणी घरातूनच होत असल्याने या प्रक्रियेत आईची भूमिका अत्यंत मध्यवर्ती ठरते. याच पार्श्वभूमीवर शाळा आणि माता-पालक यांच्यात सातत्यपूर्ण सुसंवाद निर्माण करण्यासाठी हे मेळावे आयोजित केले जाणार आहेत.

वर्षातून चार वेळा आयोजन होणार
हे मेळावे केवळ नेहमीची साधी किंवा औपचारिक मासिक सभा न राहता थेट संवादाचे एक प्रभावी माध्यम बनतील. प्रत्येक शैक्षणिक वर्षात जुलै, ऑक्टोबर, जानेवारी आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारी या मेळाव्यांचे नियमबद्ध आयोजन केले जाईल. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी अनुदानित अशा सर्व शाळांमध्ये प्रत्यक्ष शाळास्तरावर हे आयोजन होईल. मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावर याची प्राथमिक जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मेळाव्याची प्रमुख उद्दिष्टे
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मुलांचे वयानुरूप वाचन, लेखन व गणितातील प्राविण्य वाढवणे. शासकीय योजनांची माहिती मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, पीएम पोषण आहार, डिजिटल शिक्षण आणि याबाबत पालकांमध्ये जागृती निर्माण करणे. कौटुंबिक सहभाग रोज किमान 20 मिनिटे मुलांसोबत अभ्यासावर चर्चा करणे, गोष्टींची पुस्तके वाचणे आणि घरात अभ्यासाचे पोषक वातावरण तयार करणे. आरोग्य व बालसुरक्षा विद्यार्थ्यांचे पोषण, स्वच्छता, नियमित उपस्थिती, गळती रोखणे आणि बालसंरक्षणावर विशेष भर देणे.

बोलीभाषेत निमंत्रण
मेळाव्याचे नियोजन करताना शिक्षकांनी माता-पालकांना सोप्या बोलीभाषेत निमंत्रण द्यावे. बैठकीत कोणत्याही नकारात्मक चर्चा किंवा तक्रारी न करता विद्यार्थ्यांच्या चांगल्या गोष्टी सांगून सकारात्मक वातावरणात सुलभन करावे. मातांसोबत येणाऱ्या लहान मुलांमुळे बैठकीत अडथळा येऊ नये म्हणून त्यांच्या खेळण्याची वेगळी सोय करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मेळाव्यानंतर उपस्थितांची नोंद, छायाचित्रे आणि प्राप्त सूचनांच्या आधारे शाळा विकास आराखड्यात आवश्यक सुधारणा करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

Exit mobile version