मुलांच्या प्रवेशासाठी भर पावसात पालक रस्त्यावर

रिलायन्स फाऊंडेशन स्कूलवर धडक

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

बेणसे ग्रामपंचायत हद्दीतील रिलायन्स फाउंडेशन स्कूल नागोठणे येथे सोमवारी (दि.17) स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी बेणसे, झोतिरपाडा, शिहु, बेणसेवाडी, कुहिरे, चोळे गांधे, कुर्डुस व अन्य पंचक्रोशीतील स्थानिक महिला व पालकांनी भर पावसात आंदोलन केले. यावेळी शाळेच्या गेटबाहेर थांबून आक्रमक पवित्रा घेतला.

यावेळी संतप्त झालेल्या पालकांनी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, जोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळत नाही, तोपर्यंत आम्ही भर पावसात आंदोलन अधिक उग्र करू, असा इशारा बेणसे उपसरपंच-सरपंच प्रीती उद्धव कुथे तसेच ग्रामपंचायत सदस्य व पालकांनी दिला. यावेळी नागोठणे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संदीप पोमन, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व पोलीस कर्मचारी देखील बंदोबस्तासाठी हजर होते.

आम्ही ऑनलाइन मुदतीत फॉर्म भरलेल्या अधिकाधिक मुलांना प्रवेश दिला असल्याचे रिलायन्स व्यवस्थापनाचे अधिकारी व शाळा व्यवस्थापन यांच्याकडून सांगितले. मात्र, आंदोलनकर्त्यां पालकांनी ऑनलाइन फॉर्म भरून देखील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसल्याची तक्रार मोबाईल वरील ऑनलाईन फॉर्म दाखवून केली. यावेळी प्रीती कुथे, सुप्रिया भगत, छाया चंद्रकांत पिंगळे, संजोती गदमळे आदी महिलांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

यावेळी राजेश गोरे, शौकत मोमीन, श्री खाडे, मनोहर कुथे यांनी ही आपली रोखठोक भूमिका मांडली, त्यास बेणसे ग्रामपंचायतीच्या अन्य उपस्थित सदस्य तसेच पालकांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी रिलायन्स व्यवस्थापन यांनी चर्चेस वेळ घेऊन याबाबत लवकरच निर्णय देउ असे लेखी पत्र दिले, त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

रिलायन्स फाउंडेशन नागोठणे स्कूलमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जात आहे. सद्यस्थितीत मोठ्या संख्येने मुले शाळेत शिक्षण घेत आहेत. वर्गाची क्षमता पाहून प्रवेश दिले जात आहेत. स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या दृष्टीने आम्ही सकारात्मक भूमिकेत आहोत. दोन दिवसात रिलायन्स व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकारी वर्गाशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार आहोत.

अजिंक्य पाटील, इस्टेट मॅनेजर, रिलायन्स नागोठणे
Exit mobile version