दत्तनामाच्या गजरात दत्तटेकडीला परिक्रमा

वार्डे गुरुजी दत्त आरती मंडळाचा स्तुत्य उपक्रम

| चौल | राकेश लोहार |

दत्त दिंगबरा या हो.. स्वामी मला भेट द्या हो.. अशा आर्ततेने दत्तचरणी लीन होत आणि श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नामघोषात, ढोल-ताशांच्या गजरात चौल-भोवाळे येथील पर्वतनिवासी दत्तमहारांच्या डोंगराला गुरुवार, दि. 21 रोजी परिक्रमा करण्यात आली. टाळ-मृदुंगाचा गजर आणि जोडीला एका सुरात अव्याहतपणे होणारा दत्तनामाचा गजर यामुळे परिक्रमेचा मार्ग दुमदुमून गेला. भक्तीमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी शेकडो दत्तभक्त उपस्थित होते.


वार्डे गुरुजी दत्त आरती मंडळ चौल यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमहाराजांच्या प्रतिमेची पालखी परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. यावर्षीचे पालखी परिक्रमेचे हे तिसरे वर्ष होते. या पालखी परिक्रमेत शेकडोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. पर्वतनिवासी दत्तात्रेयांचे स्वयंभू स्थान असलेल्या संपूर्ण भोवाळे डोंगराला यावेळी पायी प्रदक्षिणा घालण्यात आली.

दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा अखंड जयघोष, पादुका आणि मूर्तीवर होणारी पुष्पवृष्टी, मंदिरात केलेली विविधरंगी फुलांच्या माळांची आकर्षक सजावट आणि याची देही याची डोळा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर भाविकांची गर्दी जमली होती. यावेळी सुवासिनींकडून दत्तमहारांचे औक्षण करण्यात आले. अशा भक्तिमय वातावरणात दत्तमहाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी तीन वाजता पालखी मंदिरातून मार्गस्थ झाली. स्वामी समर्थ मंदिरमार्गे, पुढे सराई, सोमेश्वर मंदिर, हनुमानपाडा अशी मार्गक्रमणा करीत भोवाळे येथून दत्तमंदिरात सायंकाळी सहाच्या सुमारास प्रस्थान झाले. दरम्यान, पहिल्या टप्प्यात सोमेश्वर मंदिरात पालखी विश्रांतीसाठी काही काळ ठेवण्यात आली. यावेळी चौल येथील दत्तभक्त नितीन पाटील (बेलोसकर) यांच्याकडून चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर पालखी मंदिराकडे मार्गस्थ झाली. जवळपास तीन तासांच्या मार्गक्रमणानंतर पालखीचे दत्तमंदिरात प्रस्थान झाले. महाआरती झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. महाप्रसादाच्या आस्वादाने भाविक कृतार्थ झाल्याचे पाहावयास मिळाले. हा महाप्रसाद शेकापचे ज्येष्ठ नेते दत्तभक्त द्वारकानाथ नाईक (कबन अण्णा) यांच्याकडून देण्यात आला.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दत्तमंदिराचे गुरव प्रभाकर आगलावे, आशिष वासुदेव, सचिन राऊत, अरुण टेकाळकर, संदीप नागावकर आणि वार्डे गुरुजी दत्त आरती मंडळ, चौलच्या सभासदांनी मेहनत घेतली. या पालखी सोहळ्यादरम्यान द्वारकानाथ नाईक, चौल ग्रा.पं. उपसरंपच अजित गुरव आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले.

विशेष सत्काराचे आयोजन
पायी परिक्रमेचे हे सलग तिसरे वर्ष असून, याहीपुढे हा सोहळा दरवर्षी अखंडितपणे सुरु राहणार आहे. दत्तभक्तांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हा सोहळा यशस्वी पार पडला. मंदिराचे गुरव प्रभाकर आगलावे, आरती मंडळाचे संस्थापक वार्डे गुरुजी यांचे सुपुत्र रमेश वार्डे यांच्या विशेष सहकार्याबद्दल मंडळाकडून सत्कार करण्यात आला.
Exit mobile version