खारघरमधील उद्यानांकडे दुर्लक्ष

| पनवेल | वार्ताहर |

खारघर वसाहत विकसित करताना सिडकोने शहराच्या सौंदर्यात भर घालणारे सेक्टरनिहाय मैदान आणि उद्याने विकसित केली आहेत. सिडकोने ही उद्याने पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित केली आहेत. मात्र, सुरक्षेच्या अनुषंगाने लक्ष दिले जात नसल्याने उद्यानात प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे, तसेच बंद दिव्यांमुळे मद्यपींचा वावर वाढला आहे. महापालिकेने दसऱ्याच्या मुहूर्तावर खारघरमधील उद्यानात पहाटे पाच, दुपारी एक आणि तीन ते रात्री अकरा या वेळेत सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. मात्र, उद्यानाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांसाठी केबिन, तसेच आसन व्यवस्थेची सोय नसल्यामुळे सुरक्षा रक्षक प्रवेशद्वाराऐेवजी उद्यानात झाडांचा आसरा घेत कर्तव्य बजावत आहेत. असाच काहीसा प्रकार सेक्टर वीस आणि सेक्टर 12 मधील वासुदेव बळवंत फडके उद्यानातही दिसून आला होता. यावेळी सुरक्षा रक्षक उद्यानात मोबाईलवर व्यस्त असल्याचे दिसून आले. त्यामुळे उद्यानातील सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे.

Exit mobile version