दोनशेहून अधिक गाड्या होणार पार्क; सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार
| माथेरान | प्रतिनिधी |
दस्तुरी नाक्यावर सुसज्ज वाहनांची पार्किंगची सुविधा पूर्ण झालेली असताना याठिकाणी अंधाऱ्या रात्री पर्यटकांच्या किंमती वाहनांच्या सुरक्षेसाठी जागोजागी विजेचे पोल बसविण्यात आले आहेत. त्याठिकाणी लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे सुध्दा लावण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यटक आपली वाहने निर्धास्तपणे पार्क करू शकतात. दस्तुरी पार्किंगमधील अतिक्रमित जागा मोकळी करून त्याठिकाणी उत्तम प्रकारे वाहने पार्किंगची सुविधा नगराध्यक्षांनी केली असून, जवळपास दोनशेहून अधिक गाड्या अगदी सहज पार्क केल्या जाऊ शकतात असे बोलले जात आहे.
मागील सुट्टयांच्या हंगामात पर्यटकांना नाईलाजास्तव मिळेल त्या ठिकाणी कुठेही जंगलात वाहने पार्क करावी लागत होती. तसेच अनेकदा जागेअभावी पर्यटकांना घाटात तासनतास वाहतूक कोंडीमुळे त्रासदायक बनले होते. याचा इथल्या पर्यटनावर परिणाम होतांना दिसून आला होता. ही गंभीर बाब ओळखून नगराध्यक्षांनी दस्तुरी नाक्यावरील अतिक्रमित जागा मोकळी करून सुसज्ज पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. यावेळी त्यांच्या सोबत केतन रामाणे, दिलीप सकपाळ, शाकिर मुजावर तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावरून सातत्याने पर्यटकांची रेलचेल सुरू असते. पर्यटकांवर सर्वांचे जीवनमान अवलंबून असते. त्यामुळे त्यांची एन्ट्री होताना साधी पार्किंगची सोय नसावी हे पर्यटन वाढीस धोकादायक ठरू शकते. त्यांच्या किंमती गाड्या सुरक्षित पार्क व्हाव्यात, त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहणार आहे.
चंद्रकांत चौधरी
नगराध्यक्ष माथेरान नगरपालिका
शंतनू आपटे
यावेळी दस्तुरी पार्किंग मध्ये अगदी सहज आम्ही गाडी पार्क केली. गेल्या वर्षी याच महिन्यात आम्हाला पार्किंगसाठी जागाच उपलब्ध न झाल्यामुळे आम्ही येथून थेट लोणावळ्याला गेलो होतो. परंतु, यावेळी पार्किंगची छान सोय झाल्यामुळे आमच्या कुटुंबाला समाधान वाटले.
पर्यटक मुंबई






